महाराष्ट्राच्‍या पदकांचा सुवर्णमहोत्‍सव!

 महाराष्ट्राच्‍या पदकांचा सुवर्णमहोत्‍सव!

पाटणा दि ८:– पदक तालिकेत अव्‍वल स्‍थान कायम राखत महाराष्ट्राने ७व्‍या खेलो इंडिया युवा स्‍पर्धेत गुरुवारी ५० पदकांचा आकडा पार करत पदकांचा सुवर्णमहोत्‍सव साजरा केला. टेबलटेनिस दुहेरीत सुवर्णपदक जिंकत महाराष्ट्राच्‍या मुलींनी स्‍पर्धेतील ५० वे पदक जिंकले. त्‍यापूर्वी पुण्याच्या सिद्धेश घोरपडेने सलग तिसऱ्या दिवशी पदक जिंकत पदकांची हॅट्ट्रिक साजरी केली.
खेलो इंडिया स्‍पर्धेत सर्वप्रथम पदकांचे अर्धशतक झळकविण्याची हॅटट्रिक करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्‍य ठरले आहे. स्‍पर्धेच्‍या पाचव्‍या दिवशी १९ सुवर्ण, १६ रौप्‍य व १५ कांस्यपदकांची लयलूट करून महाराष्ट्राने अव्‍वल स्‍थान कायम राखले होते. आज संपलेल्‍या सायकलिंग, मल्‍लखांब स्‍पर्धेत महाराष्ट्राने सुवर्ण सांगता केली. दिल्‍लीत संपलेल्‍या सायकलिंग स्‍पर्धेत ३ सुवर्ण २ रौप्‍य व १ कांस्य पदक जिंकली. गयातील मल्‍लखांब स्‍पर्धेत २ सुवर्ण ५ रौप्‍य व २ कांस्य अशी ९ पदके महाराष्ट्राने कमवली. जलतरणात सर्वाधिक १९ पदके महाराष्ट्राने जिंकली आहे. आर्चरीतील ६ सुवर्णासह ९ पदकांचा विक्रमी कामगिरी महाराष्ट्राने केली आहे.
सायकलिंगमध्ये महाराष्ट्राच्या सिद्धेश घोरपडेने सलग तिसऱ्या दिवशी पदक जिंकत पदकांची हॅट्ट्रिक साजरी केली. ट्रॅक सायकलिंग स्पर्धेत गुरुवारी अखेरच्या दिवशी मराठमोळ्या सिद्धेशने केरिन रेसमध्ये बाजी मारत सुवर्ण पदकावर मोहर उमटवली. झारखंडचा बिकाश ओरेन रौप्य पदकांचा मानकरी ठरला, तर तेलंगणाच्या थानिश कुमार सिंगला कांस्यपदक मिळाले.
नवी दिल्लीतील यमुना वेलोड्रम इंदिरा गांधी स्टेडियममध्ये ही ट्रॅक सायकलिंग स्पर्धा पार पडली. सिद्धेश घोरपडेने पहिल्या दिवशी स्क्रॅचरेस इव्हेंटमध्ये सुवर्णपदक जिंकत आपल्या मोहिमेचा श्रीगणेशा केला होता. मग दुसऱ्या दिवशी त्याने ट्रॅक सायकलिंगच्या इंडिव्हिजल परशूट प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. आज त्याने पुन्हा एकदा सोनेरी यशाने मोहिमेची सांगता केली.
नव्‍याने उभारण्यात आलेल्‍या राजगीर क्रीडा संकुलात महाराष्ट्राच्‍या मुलींच्‍या संघाने दुहेरीत सुवर्ण पदक जिंकून टेबलटेनिसमधील पदकाचे खाते उघडले.
महाराष्ट्राच्या काव्‍या भट व दिव्‍याश्री भौमिकने पश्चिम बंगालच्‍या अविशा कर्माकर व शुभाक्रिता दत्तचा ११-६, ११-९,११-७ गेमने पराभव करीत पर्दापणातच सुवर्ण यशाला गवसणी घातली. यजमान बिहार व उत्तरप्रदेश संघाला पराभूत करून काव्‍या -दिव्‍याश्री जोडीने अंतिम फेरीत मजल मारली होती.
अंतिम लढतीत डावखुऱ्या काव्‍या भटने जोरदार स्‍मॅशेस घेत सुरूवातीपासून महाराष्ट्राने आघाडी घेतली होती. दुसऱ्या गेममध्ये बंगालच्‍या खेळाडूंनी चिवट झुंज देण्याचा प्रयत्‍न केला. काव्‍या -दिव्‍याश्रीने आक्रमक खेळी करीत पर्दापणातच सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. चेन्‍नई येथील खेलो इंडियात काव्‍या तर .दिव्‍याश्री बेंगलोरमध्ये सराव करीत असते. खेलो इंडिया योजनेमुळे माझा खेळ उंचविला यामुळेच मी पदक विजेती ठरली असून, आता एकेरीतही मला पदक जिंकयचे असल्‍याचे काव्‍याने सांगितले.
ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *