महाबळेश्वर सोहळ्याने स्थानिक आणि पर्यटकांना झाली कटकट

महाबळेश्वर, 5 मे – थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर येथे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी दिनांक २ ते ४ मे रोजी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या वतीने महाबळेश्वर महा पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. परंतु, व्ही.आय.पी व मंत्र्यांच्या ताफ्यामुळे अक्षरशः काही पर्यटकांची चांगलीच जिरली. त्यामुळे या महोत्सवाला पर्यटन मुक्त महोत्सव साजरा झाल्याची टीका होऊ लागलेली आहे.
गेली महिनाभर मोठा गाजावाजा करून महाबळेश्वर सारख्या थंड हवेच्या ठिकाणी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि जिल्हा प्रशासनाने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने या महा पर्यटन महोत्सवाची जोरदार तयारी केली होती. वेण्णा लेक फेस्टिवल,फूड फेस्टिवल, हेलिकॉप्टर सफर, साहसी खेळाचे प्रात्यक्षिका, परिषद आणि कार्यशाळा, भव्य सांस्कृतिक कार्यक्रम, मंदिर दर्शन, लेझर आणि ड्रोन शो, सांस्कृतिक मिरवणूक, किल्ले आणि शस्त्र प्रदर्शनी असे विविध उपक्रम राबवण्यात आले होते .परंतु, सहभागी होण्यासाठी आलेल्या पर्यटकांना त्याचा मनस्वी आनंद घेता आला नाही. कारण दुपारी अचानक हेलिकॉप्टरच्या फेऱ्या तांत्रिक अडचणीमुळे रद्द करण्यात आल्याचे अचानक घोषित केले होते. महाबळेश्वरच्या थंड हवेच्या ठिकाणी व्ही.आय.पी. मंत्री व अधिकारी आणि त्यांच्या सोबत आलेल्या लवाजम्याचे स्वागत व पाहुणचारासाठी कमी पडू नये. यासाठी पुरेपूर काळजी घेण्यात आली होती. एवढेच नव्हे तर प्रत्येक गोष्टीसाठी स्थानिक पातळीवर नियोजन करण्या ऐवजी पुणे- मुंबई शहरातील एजन्सीला काम दिल्यामुळे मराठी मातीत चाललेला हा महोत्सव कुठेतरी पर प्रांतात होत असल्याचा भास निर्माण झाला.
हिंदी व इंग्रजी भाषेशिवाय प्रसार माध्यम प्रतिनिधी आणि मोजक्या पर्यटकांना संवाद साधने कठीण झाले होते. सातारचे जिल्हाधिकारी संतोष पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापक सूर्यवंशी व संचालक पाटील तसेच जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांच्यासह अनेक जण हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी प्रामाणिकपणाने झटत होते. त्यांनी प्रत्येक पर्यटक व प्रसार माध्यमाच्या सर्वांशी समन्वय साधून हा महोत्सव यशस्वी करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यामुळेच काही थोडेफार यश मिळाले असे म्हणावे लागेल.
महाबळेश्वर सारख्या पर्यटन ठिकाणी चोर बाजूने पर्यटन घेतात परंतु एकेरी मार्ग व व्ही.आय.पी. मंत्र्यांच्या बंदोबस्ताच्या ताफा व सायरनच्या आवाजामुळे अनेक पर्यटकांना रस्त्यातील अडथळा शर्यत पार करावी लागत होती.अनेकांनी महोत्सवात सहभाग होण्यापेक्षा पाचगणी आणि तापोळ्याकडे जाणे पसंत केले. एक मात्र नेमका फायदा झाला की, यामुळे वाई व तापोळा तसेच व पाचगणी परिसरातील पर्यटनाला वाढीस अनुकूल वातावरण निर्माण झाल्याने अनेकांचा व्यवसाय वाढीला लागला. त्यांनी या महोत्सवाबद्दल चांगल्या प्रतिक्रिया दिल्या. तर या महोत्सवासाठी आलेल्या काही पर्यटकांची चांगली जिल्ह्याची भावना त्यांनी व्यक्त केली. हेलिकॉप्टर नादुरुस्त हेलिकॉप्टरचा आकाशात पंखा फिरला नाही पण अनेकांना त्रासामुळे डोकी फिरत असल्याचा अनुभव घ्यावा लागला. एवढ्या मोठ्या महोत्सवासाठी हेलिकॉप्टर नादुरुस्त झाले कसे? असा प्रश्न काही पर्यटकांनी उपस्थित केला आहे.
स्थानिक प्रसारमाध्यमांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे या महोत्सवाला चांगली प्रसिद्धी दिली. पण पर्यटकांच्या विना झालेला हा महोत्सव बरेच काही सांगून गेला. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या गटातील स्थानिक आमदार तथा पुनर्वसन व मदत मंत्री नामदार मकरंद पाटील व त्यांचे समर्थक महाबळेश्वर परिसरामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी सहभाग घेतात. पण, या महोत्सवामध्ये त्यांच्या नोंद घेण्यासारखा असा कुठेही सहभाग दिसून आला नाही. मग नेमका महोत्सव कुणासाठी होता? वास्तविक पाहता सुट्टीच्या दिवशी नेहमीप्रमाणे पाचगणी– महाबळेश्वरला पर्यटकांची गर्दी होते. या महोत्सवामुळे असा नेमका किती फायदा झाला? याचा लेखाजोखा आता राजकीय विरोधकांनी मागावा. असेच या महोत्सवाने सिद्ध करून दाखवल्याची प्रतिक्रिया काही पर्यटकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, सुट्टी संपल्यामुळे अनेक पर्यटकांनी परतीचा प्रवास करत असताना तापोळा व पाचगणी परिसरात मिळालेल्या नैसर्गिक आनंद व हॉटेल व्यवसायिकांच्या सेवेमुळे समाधान व्यक्त केले.