गंगा स्वच्छता अभियानाला मिळाला Tax Exemption Status

नवी दिल्ली, दि, २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाला (NMCG) आता करमुक्त दर्जा देण्यात आला आहे, असे केंद्रीय थेट कर मंडळाच्या (CBDT) अधिसूचनेमध्ये नमूद करण्यात आले आहे. नमामि गंगे या गंगा नदीच्या स्वच्छता आणि संवर्धनासाठीच्या महत्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाला पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, 1986 अंतर्गत प्राधिकृत प्राधिकरण म्हणून घोषित करण्यात आले आहे. या निर्णयानुसार, राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाला मूल्यांकन वर्ष 2024-25 पासून उत्पन्न करमाफीचा लाभ मिळणार आहे.
गंगा नदीच्या संवर्धनासाठी सुरू असलेल्या या योजनेसाठी आर्थिक पाठबळ मिळावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे गंगा नदी स्वच्छता आणि संवर्धनाच्या कार्यात गती येईल, अशी अपेक्षा आहे. भारत सरकारने या अधिसूचनेद्वारे गंगा संवर्धनाचे कार्य अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे.
गंगा स्वच्छता अभियान, ज्याला नमामि गंगे प्रकल्प म्हणून ओळखले जाते, हा भारत सरकारचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. २०१४ मध्ये सुरू झालेल्या या योजनेचा उद्देश गंगा नदीसह इतर नद्यांचे प्रदूषण कमी करणे आणि त्यांचे संवर्धन करणे आहे. गंगा नदीत अर्धवट जळालेले मृतदेह टाकणे, सांडपाणी आणि औद्योगिक कचऱ्यामुळे प्रदूषण वाढत आहे
नमामि गंगे प्रकल्पांतर्गत २९० जलशुद्धीकरण केंद्र (एसटीपी) बांधण्याचे नियोजन करण्यात आले होते, परंतु आतापर्यंत केवळ १४७ प्रकल्प पूर्ण झाले आहेत. उर्वरित प्रकल्प बांधकामाच्या विविध टप्प्यात आहेत.
सध्या बांधलेले एसटीपी दररोज ६,२७४ दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया करू शकतात, परंतु आजची गरज किमान १२ हजार दशलक्ष लिटर प्रतिदिन आहे