काश्मिर दहशतवादी हल्ला, गृहमंत्री अमित शहा यांनी दिली घटनास्थळी भेट

पहलगाम, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथील पहलगाममध्ये पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी देशीविदेशी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 13 जण जखमी झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून बैसरन व्हॅलीची पाहणी करण्यात आली. पहलगाम येथे नेमकी घटना कशी घडली, याबाबत अमित शाह यांनी माहिती घेतली. जम्मू काश्मीरचे नायब राज्यपालही यावेळी अमित शाहांसोबत उपस्थित होते. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर दुपारी अमित शाह दिल्लीकडे रवाना होणार आहेत. यानंतर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेटही घेणार आहेत. या हल्ल्याच गांभीर्य लक्षात घेऊन सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी तातडीने भारतात दाखल झाले आहेत.
अमित शाह यांनी घटनास्थळी पोहचण्याआधी जम्मू काश्मीर पोलीस कंट्रोल रूममधे मृतांच्या पार्थिवाचं अंतिमदर्शन घेतलं. अमित शाह यांनी यावेळी मृतांच्या परिवाराचं सांत्वन केलं. यानंतर अमित शाह यांनी ट्विट करत दहशतवाद्यांना इशारा दिला आहे. अमित शाह यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली. तसेच भारत दहशतवाद्यांसमोर झुकणार नाही, असं अमित शाह म्हणाले. तसेच या भ्याड दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगारांना सोडले जाणार नाही, असा इशारा देखील अमित शाह यांनी दिला.
पहलगाममधील दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे. दिल्लीच्या साऊथ ब्लॉकमधील केंद्रीय संरक्षण मंत्रालयात तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख, अजित डोवाल आणि संरक्षण मंत्रालयाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर भारतीय सैन्यदलाला (Indian Army) अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.