स्वतःच्या रक्तातून बाबासाहेबांना अभिवादन

मुंबई दि.13 (एम एमसी न्यूज नेटवर्क): चित्रकलेचा उल्लेख झाला की डोळ्यासमोर रंग, कुंचला आणि कॅनव्हास उभा राहतो. पण नाशिक जिल्ह्यातील देवळाली तालुक्यातील हाडोळा गावचे डॉ. संतोष कटारे यांनी या पारंपरिक चौकटीला छेद देत एक आगळीवेगळी कला विकसित केली आहे. ब्लड आर्ट!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर, डॉ. कटारे यांनी स्वतःच्या रक्तातून बाबासाहेबांची सही काढून त्यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले. हा क्षण उपस्थितांसाठी अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी ठरला.
डॉ. कटारे गेल्या १५ वर्षांपासून रक्तातून चित्रकला साकारत असून त्यांनी आतापर्यंत ६० पेक्षा अधिक चित्रे काढली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, माता रमाई, शहीद भगतसिंग, मदर टेरेसा अशा थोर व्यक्तिमत्त्वांचे त्यांनी रक्तातून चित्रण केले आहे. इतकेच नव्हे, तर भारतीय संविधानाची प्रस्तावना आणि राष्ट्रगीत देखील त्यांनी रक्तातून रेखाटले आहे.
एक चित्र पूर्ण करण्यासाठी सरासरी एक तासाचा कालावधी लागतो. त्यांच्या या अद्वितीय कलाकृतींना लंडन, फ्रान्स, दुबई आणि दिल्लीसारख्या ठिकाणी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यामध्ये लंडनचा सर्वोच्च सन्मान, दुबईतील डिलिट पदवी, फ्रान्समधील पीएच.डी., दिल्लीतील ‘नेल्सन मंडेला पुरस्कार’ यांचा समावेश आहे. मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे अभिनेता अरबाज खान यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्यात आला.
डॉ. कटारे यांच्या कार्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी शिफारस करण्यात आली असून दुबईतील एका विशेष समारंभात शेख अहमद बिन फैसल अल कासिमी यांच्या उपस्थितीत त्यांना गौरविण्यात आले.
“रक्त हे जीवनदायी असते, आणि तेच वापरून समाजप्रबोधनाची मशाल पेटवणारे डॉ. संतोष कटारे हे केवळ कलाकार नाहीत, तर ते सामाजिक समतेचे, जागृतीचे आणि प्रेरणेचे प्रतीक आहेत,” असे या वेळी बोलताना अनेकांनी नमूद केले. त्यांच्या कार्यामुळे असंख्य युवकांना प्रेरणा मिळत आहे. या प्रेरणादायी कार्यक्रमाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (युवक आघाडी) कोकण प्रदेशाचे उपाध्यक्ष उमेश कदम, तसेच राजेश माळोदे, अजय वाहने, गौतम शेंडे, सुरेश शेंडगे, कुलकर्णी सर आदी मान्यवर उपस्थित होते.
SW/ML/SL
13 April 2025