मुंबईत लवकरच सुरु होणार ८ किमीचे स्वतंत्र सायकल ट्रॅक

मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शहरातील आरोग्य प्रेमी मंडळींची वाढती संख्या लक्षात घेऊन मे अखेरपर्यंत मुंबईमध्ये सुमारे ८ किलोमीटर लांबीचे स्वतंत्र सायकल ट्रॅक नागरिकांना उपलब्ध करून दिले जातील, अशी ग्वाही मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली.
मुंबईतील पहिली वहिली “वॉकेबल सिटीज मुंबई परिषद” वॉकिंग प्रोजेक्ट या २०१२ पासून कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्थेच्या पुढाकाराने वाय. बी. चव्हाण केंद्रात पार पडली. या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, मुंबईला आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा आणि पर्यावरणीय व्यवस्थेची अजूनही कमतरता आहे. शहराच्या तुलनेत उपनगरांमध्ये पादचारी सुविधा खूपच कमी आहेत. तसेच सध्या मुंबई महानगर क्षेत्रात मेट्रोचा विस्तार, अटल सेतु सारख्या मोठ्या पायाभूत सेवा निर्माण केल्या जात असल्याने नागरिकांना रस्त्यात चालण्यात समस्या येत आहेत. परंतु त्या सुधारण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत,” गगराणी म्हणाले.
या परिषदेत सार्वजनिक धोरण तज्ञ, नागरी आराखडा आणि स्थापत्यविशारद, तसेच शास्त्रज्ञ आणि अभ्यासकांची मुंबईमधील पादचारी सुविधा आणि पर्यावरणीय व्यवस्था सुधारण्यासाठी विविध स्तरांवर खाजगी आणि सरकारी माध्यमातून कोणते उपाय योजावे लागतील यावर विस्तृत चर्चासत्रे पर पडली.
‘वॉकिंग प्रोजेक्ट’चे अध्यक्ष आणि सल्लागार आणि सनविन या कंपनीचे सीईओ संदीप बजोरिया म्हणाले की, मुंबईकरांना चांगल्या आणि आरोग्यदायी नागरी सुविधा देण्यासाठी आम्ही सरकारी यंत्रणा, महापालिका तसेच खाजगी संस्थांबरोबर अत्यंत सकारात्मक आणि रचनात्मक दृष्टिकोनातून कार्य करीत राहू. या परिषदेद्वारे मुंबईला अधिक चालण्यायोग्य आणि सायकलस्नेही शहर बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
SL/ML/SL
8 April 2025