मुंबई बाजार समितीत एक लाख हापूस आंबा पेट्या दाखल

मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई बाजार समितीत हापूस आंब्यांच्या पेट्यांची प्रचंड झाली आहे. आज 1 लाख हापूस आंब्यांच्या पेट्या बाजारात दाखल झाल्याने दर कमी झाले आहेत. 80 हजार हापूस आंब्याच्या पेट्या कोकणातील रायगड , रत्नागिरी , सिंधूदूर्ग जिल्ह्यातून आल्या आहेत. तर उर्वरीत 20 हजार पेट्या परराज्यातून आल्या आहेत. यामध्ये कर्नाटक, केरळ राज्यांचा समावेश आहे. कर्नाटकचा हापूस 60 ते 120 रुपये किलोने विकला जात आहे.
कोकणातील हापूस आंब्याला 1500 ते 3500 रुपयांचा दर हा चार डझनाच्या पेटीला मिळत आहे. मे महिन्याच्या 10 तारखेपर्यंत हापूस आंब्याचा सिझन चांगला असल्याने खवय्यांनी याच काळात आंबा खरेदी करावे असे आवाहन व्यापारी वर्गाने केले आहे. हापूस आंब्या बरोबर तोतापुरी , बदामी या जातीचे आंबे सुध्दा बाजारात येवू लागले आहेत.
फळ बाजारात हापूसची आवक वाढत असून, परदेशातून देखील हापूसची मागणी वाढत आहे. त्यामुळं याचा फायदा कोकणातील आंबा बागायतदारांना होणार आहे. आखाती देशात चांगलाच दर मिळत आहे. कोकणात खास करुन रत्नागिरी, देवगड आणि रायगड जिल्ह्यातील हापूस हा जगप्रसिद्ध आहे. कोकणात अडीच लाख मेट्रीक टन उत्पादनापैकी 25 हजार मेट्रीक टन फळाची तर 10 हजार मेट्रीक टन मॅंगो पल्पची निर्यात होते. त्यामुळं 340 कोटी रुपयांचे परकीय चलन मिळते.