किल्ले रायगडावर १२ एप्रिल रोजी शिवसमाधी शताब्दी महोत्सव

मुंबई दि.7(एम एमसी न्यूज नेटवर्क): किल्ले रायगड येथे येत्या शनिवार, १२ एप्रिल २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची ३४५ वी शिवपूण्यतिथी तसेच शिवसमाधी जीर्णोद्धार शताब्दी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमात केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
लोकमान्य टिळकांनी १८९५ साली स्थापन केलेल्या श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही चैत्र पौर्णिमा, शके १९४७ रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यंदा शिवसमाधी जीर्णोद्धारास १०० वर्षे पूर्ण होत असल्यामुळे या कार्यक्रमास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार ,केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ,कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील,आशिष शेलार, यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक मान्यवर मंत्री आणि अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी ‘श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार’ दुर्ग अभ्यासक निळकंठ रामदास पाटील यांना प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज उदयसिंह होळकर आणि निवृत्त लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी (PVSM, AVSM, SC, SM, VSM) यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे.
कार्यक्रमाच्या आदल्या रात्री समाधीला दीपवंदना करण्यात येणार आहे. जगदीश्वर प्रांगणात कीर्तन आणि जागर आयोजित केला असून, राजसभेत शाहीर सुरेशराव सूर्यवंशी यांचा ‘ही रात्र शाहिरांची’ हा खास कार्यक्रम सादर होईल. शिवभक्तांसाठी रात्रीचे भोजन, निवास, सकाळची न्याहरी आणि महाप्रसाद यांची व्यवस्था मंडळातर्फे करण्यात आली आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमास ११ व १२ एप्रिल रोजी शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाचे अभय जगताप व प्रमोद काटे यांनी केले आहे.