राज्य सरकार करणार ३ अत्याधुनिक AI उत्कृष्टता केंद्रांची स्थापना

 राज्य सरकार करणार ३ अत्याधुनिक AI उत्कृष्टता केंद्रांची स्थापना

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भविष्यातील AI तंत्रज्ञानाचे महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकार अधिक कार्यक्षम प्रशासनासाठी याबाबत महत्त्वपूर्ण पावले उचलत आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारने मायक्रोसॉफ्टसोबत (Microsoft) एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा करार झाला. महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि मायक्रोसॉफ्टचे वेंकट कृष्णन यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या भागीदारीमुळे मायक्रोसॉफ्ट आपल्या जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त MS Learn प्लॅटफॉर्मद्वारे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी AI प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र कार्यक्रम चालवणार आहे. यामुळे प्रशासकीय कार्यक्षमता सुधारेल आणि कर्मचाऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान शिकण्याची संधी मिळेल. या करारानुसार, राज्यात प्रशासनाला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून अधिक सक्षम करण्यासाठी तीन उच्च-तंत्रज्ञानयुक्त AI उत्कृष्टता केंद्रे उभारली जाणार आहेत.

मुंबई येथे भू-विश्लेषण केंद्र: मुख्य सचिव कार्यालयात हे केंद्र कार्यरत होईल आणि उपग्रह प्रतिमा व जीआयएस तंत्रज्ञानाचा वापर करून शासकीय धोरणे ठरवण्याच्या प्रक्रियेत मदत करेल. पर्यावरण, शहर विकास आणि आपत्ती व्यवस्थापनात याचा मोठा उपयोग होईल. पुणे येथे न्यायवैद्यक आणि AI केंद्र: या केंद्रात गुन्हेगारी तपास आणि न्यायवैद्यक विश्लेषणात AI तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, ज्यामुळे तपास अधिक प्रभावी आणि जलद होईल. न्यायप्रणालीच्या निर्णयांमध्ये अचूकता वाढण्यास मदत होईल.

नागपूर येथे MARVEL केंद्र: MARVEL (Maharashtra Advanced Research & Vigilance for Enforcement of Reformed Laws) हे केंद्र प्रशासनात AI आधारित उपाययोजना लागू करेल. प्रशासनात अधिक पारदर्शकता आणणे, कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि नवीन सुधारणा घडवणे हे या केंद्राचे उद्दिष्ट असेल.

SL/ML/SL

3 March 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *