करो या मरो अशी स्थिती असताना एसटीला पूर्ण वेळ अध्यक्ष नाही !
मुंबई दि.2(एम एमसी न्यूज नेटवर्क):
एसटी महामंडळ आर्थिक संकटात सापडले असून अंदाजे ७००० कोटींची देणी थकली आहेत.करो या मरो अशी स्थिती असताना दैनंदिन कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी पूर्ण वेळ अध्यक्ष नाहीत.अध्यक्षांच्या मंजुरी अभावी २५ पेक्षा जास्त फाईल निर्णयाविना पडून असून तात्काळ पूर्ण वेळ अध्यक्ष देण्याची गरज असल्याचे मत महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केले आहे.
सध्या अध्यक्ष पदाचा अतिरिक्त कार्यभार अपर मुख्य सचिव परिवहन संजय सेठी यांच्याकडे असून त्यांच्याकडे अगोदरच खूप काम आहे.ते अभ्यासू अधिकारी असले तरी अपेक्षित वेळ न देऊ शकत नसल्याने २५ पेक्षा जास्त फाईल निर्णयाविना पडून आहेत.काही फाईल वेळेवर सह्या करून न आल्याने त्याचाही एसटीच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला असून साहजिकच त्याची आर्थिक झळ एसटीला सोसावी लागत आहे.एसटीचा मुख्य स्रोत प्रवासी उत्पन्न असून मार्च महिन्यात पहिल्या आठरा दिवसांचा आढावा घेतला तर प्रवासी संख्येत प्रतिदिन सरासरी तीन लाखांनी घट दिसत असून पुढेही या महिन्यात अखेर पर्यंत त्यात सुधारणा झालेली दिसत नाही.भाडेवाडी नंतर उत्पन्न वाढ दिसत असली तरी १४. ९५ इतकी भाडेवाढ झाली असतांना त्यातून अपेक्षित उत्पन्न मिळालेले दिसत नाही. एसटीची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खालावत चालली असून सात हजार कोटींच्यावर देणी थकली आहेत. आर्थिक संकटात सापडलेल्या एसटीला या संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचेही बरगे यांनी म्हटले आहे.
एसटीला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रवाशी संख्येत वाढ व उत्पन्नात वाढ होण्यासाठी वरिष्ठांकडून दबाव राहिला पाहिजे. आढावा बैठका घेतल्या पाहिजेत. उदिष्ट ठरवून देण्यात आले पाहिजे. पण या पैकी काहीही फारसे झालेले दिसत नसून सगळा डोलारा उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्यावर अवलंबून आहे.नियमा प्रमाणे परिवहन मंत्री किंवा परिवहन राज्यमंत्री हे दैनंदिन कामकाज पाहू शकत नाहीत.ते फक्त धोरणात्मक निर्णयात लक्ष घालू शकतात.त्या मुळे एसटीचा कारभार सद्या चालत नसून तो अलगत तरंगत असल्याची उपरोधित टीकाही बरगे यांनी केली आहे.
एकंदर एसटीचा कारभार सुधारण्याची गरज असून कर्मचाऱ्यांची थकीत देणी रक्कम व महामंडळाची एकूण थकीत देणी रक्कम चुकती करायची असेल तर कामकाजात आमूलाग्र बदल होण्यासाठी “एसटीला कुणी अध्यक्ष देता का हो अध्यक्ष “असे म्हणण्याची वेळ आली असल्याचेही बरगे यांनी म्हटले आहे.