रेल्वेच्या जमिनीवरील 103 होर्डिंग्ज अनधिकृत

मुंबई दि.2(एम एमसी न्यूज नेटवर्क): मुंबईतील मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मालकीच्या जमिनींवर एकूण 306 होर्डिंग्ज उभारण्यात आले आहेत. माहितीच्या अधिकारात (RTI) उघड झालेल्या माहितीप्रमाणे, यापैकी 103 होर्डिंग्ज कोणी बसविल्या हेच महापालिकेला ठाऊक नाही. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केलेल्या चौकशीतून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
मध्य रेल्वेच्या जमिनीवर 179 होर्डिंग्ज असून त्यापैकी 68 होर्डिंग्ज अनधिकृत आहेत, तर पश्चिम रेल्वेच्या जमिनीवर 127 होर्डिंग्ज असून त्यापैकी 35 होर्डिंग्ज अनधिकृत आहेत. पश्चिम रेल्वेच्या जमिनीवरील अनधिकृत होर्डिंग्ज ए, डी, जी दक्षिण, जी उत्तर, के पूर्व, के पश्चिम, पी दक्षिण आणि आर दक्षिण वॉर्डांमध्ये आढळून आले आहेत, तर मध्य रेल्वेच्या जमिनीवरील अनधिकृत होर्डिंग्ज ई, एफ दक्षिण, जी उत्तर, एल आणि टी वॉर्डांमध्ये आहेत.
रेल्वेच्या जमिनींवरील बेकायदेशीर होर्डिंग्ज हे सार्वजनिक सुरक्षेसाठी मोठा धोका ठरू शकतात. घाटकोपर दुर्घटनेनंतर प्रशासनाने अधिक पारदर्शकता राखणे आवश्यक आहे, असे अनिल गलगली यांनी सांगितले. महापालिकेच्या जाहिरात धोरणात सुधारणा होण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेतली पाहिजे. जर संबंधित होर्डिंग्ज अधिकृत नसतील, तर रेल्वे प्रशासनाने त्वरित ती हटवून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी. मुंबईत होर्डिंग्ज माफियांचे जाळे विस्तारत असून, परवानगीशिवाय उभारण्यात येणाऱ्या जाहिरातींमुळे महसुली तोटा होत आहे. पालिकेच्या जाहिरात धोरणात बदल करताना अधिक पारदर्शक प्रक्रिया अवलंबण्याची मागणी होत आहे. रेल्वे प्रशासन आणि महापालिकेच्या निष्क्रीयतेमुळे मुंबईतील होर्डिंग्ज माफिया बळावले असून, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.