वक्फ बोर्ड विधेयकासाठी भाजपचा व्हिप जारी

नवी दिल्ली, 1 : केंद्र सरकारकडून उद्या बुधवारी लोकसभेत वक्फ संशोधित विधेयक सादर केले जाणार असल्यामुळे भारतीय जनता पक्षाने आपल्या खासदारांसाठी तीन ओळींचा व्हीप जारी केला आहे. पक्षाच्या खासदारांनी बुधवारी दिवसभर सभागृहात उपस्थित रहावे आणि सरकारच्या भूमिकेचे समर्थन करावे असे व्हीपमध्ये म्हटले आहे.
वक्फ संशोधित विधेयक बुधवारी लोकसभेत मांडले जाणार असल्यामुळे राजकीय तणाव निर्माण झाला आहे. अशातच, लोकसभेतील भाजपचे मुख्य सचेतक डॉ. संजय जायस्वाल यांनी व्हीप जारी करून उद्या लोकसभेत दिवसभर उपस्थित राहण्यास सांगितले आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी चर्चेसाठी आठ तासाची वेळ निश्चित केली आहे. मात्र, विरोधकांनी 12 तास करण्याची मागणी केली आहे.
वक्फ विधेयकावरून सत्तापक्ष आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षांच्या खासदारांनी आज याच कारणामुळे सभागृहातून बहिर्गमन केले.