रत्नागिरीचे दोन हजार डझन हापूस आंबे लंडनच्या बाजारात…

रत्नागिरी दि २९– युरोपमधील हापूस आंबा प्रेमींनी पहिल्या 21 पेट्यांना एक डझनाचा पाच हजार रुपये भाव दिला.
पहिली दोन हजार डझन हापूस आंब्याची बॅच लंडन येथे रवाना झाली आहे . लंडनमध्ये राहणारा मराठी युवक तेजस भोसले , आमदार प्रसाद लाड, ग्लोबल कोकणचे संजय यादवराव यांनी या कामांमध्ये पुढाकार घेतला आहे.
दररोज 1000 डझन युरोपच्या मार्केटमध्ये हापूस आंबा पाठवण्याचे नियोजन सुरू झाले आहे. लांजा येथील आबिद काजी, रत्नागिरी येथील कळंबटे, दीपक उपळेकर, दत्तात्रय तांबे, देवगड येथील नरेश डामरी आणि अनेक परिश्रमी शेतकरी या उपक्रमामध्ये सहभागी झाले आहेत. रत्नागिरी हापूस आंब्याची पहिली आणि दुसरी बॅच 25 आणि 26 मार्च ला लंडनला रवाना झाली आहे. गुढीपाडव्याला हापूस आंब्यावर प्रेम करणाऱ्या युरोपमधील मराठी माणसांना आणि युरोपियन माणसांना सुद्धा रत्नागिरी आणि देवगडचा हापूस आंबा उपलब्ध होणार आहे.
हापुस आंब्याचें आकर्षण संपूर्ण जगाला आहे आता संपूर्ण जगभरात मराठी मुले केवळ नोकऱ्या नाही व्यवसाय सुद्धा करत आहेत. या मुलांच्या माध्यमातून जगभर हापूस आंबा वितरित करणे आणि आंब्याचा उद्योग विकसित करणे हे मिशन ग्लोबल कोकण च्या माध्यमातून घेतले आहे. हा आंबा रत्नागिरी राजापूर आणि देवगड मधील थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करून तो युरोपच्या बाजारात पाठवण्याची योजना आहे. गुढीपाडवा आणि हापूस आंबा हे एक समीकरण आहे आणि यासाठी गुढीपाडव्याच्या अगोदर पासून या आंबा एक्सपोर्टला सुरुवात झाली आहे. यावर्षी एक लाख डझन हापूस आंबा युरोपमध्ये विक्री करण्याचे उद्दिष्ट ग्लोबल कोकणच्या सहकार्याने तेजस भोसले यांनी घेतले आहे.
हापुस आंबा ही कोकण प्रदेशाला मिळालेली देणगी आहे आणि हा एक आंतरराष्ट्रीय ब्रँड आहे, हापूस आंब्याची विक्री कोकणातील आणि मराठी तरुणांच्या माध्यमातून देशभर आणि जगभर व्हावी अशी संकल्पना ग्लोबल कोकण राबवत आहे. याची सुरुवात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर झाली. संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रात ठिकठिकाणी ओरिजिनल कोकणातील हापूस आंबा हापूस प्रेमी ग्राहकांना उपलब्ध होईल यात कर्नाटकच्या आंब्याची भेसळ होणार नाही .अशा स्वरूपाची योजना ग्लोबल कोकणच्या माध्यमातून संजय यादवराव यांनी बनवली आहे. यावर्षी मुंबई आणि पुण्यामध्ये हापूस आंब्याचे शेतकरी अंबा बाजार – आंबा महोत्सव आयोजित करण्याचे ग्लोबल कोकण ने ठरवले आहे. आमदार प्रसाद लाड यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे.
तेजस भोसले हा गेली वीस वर्ष युरोपमध्ये राहतो आणि संपूर्ण युरोपमध्ये भाज्या आणि हापूस आंबा वितरित करण्यासाठी काम करणारा मराठी युवक आहे, सचिन कदम हा चिपळूण तालुक्यातील तरुण सुद्धा संपूर्ण युरोपमध्ये हापूस आंब्यासाठी काम करतो. ग्लोबल कोकण चळवळीशी संबंधित हे दोन्ही तरुण युके फ्रान्स जर्मनी आणि युरोप मधल्या देशांमध्ये हे हापूस आंबे विकण्याचे काम करतात आणि या पुढच्या काळात मोठ्या प्रमाणात करणार आहेत. यावर्षी संपूर्ण युरोपात मराठी तरुणांच्या माध्यमातून एक लाख डझन हापूस आंबा विक्रीचे उद्दिष्ट ठेवले आहे. हापूस आंब्याला खऱ्या अर्थाने जागतिक प्रतिष्ठा देण्याचे काम हे तरुण करत आहेत.
द्राक्ष , नाशिक आणि सांगली मधून केळी, जळगाव मधून देशभर वितरित होतात मात्र हापूस आंबा हा दलाल आधारित अर्थव्यवस्था आहे. आंबा पिकतो कोकणात मात्र याचे वितरण मुंबईतून होते. थेट कोकणातून देशभर आणि जगभर आंबा जावा, याकरता ग्लोबल कोकण पुढाकार घेणार आहे. कोकणातील अतिशय परिश्रमी शेतकरी जे आपल्या बागांची खूप काळजी घेतात, आणि अतिशय दर्जेदार हापूस आंबा ग्राहकांना पोहोचावा यासाठी अतोनात प्रयत्न करतात अशा शेतकऱ्यांना एकत्र आणून हापूस आंब्याचे घाऊक मार्केट थेट शेतकऱ्यांकडून महाराष्ट्रात आणि देशभरात ग्राहकांकडे अशा स्वरूपाचा उपक्रम ग्लोबल कोकण राबवत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात किमान 500 मराठी तरुणानी आणि कोकणी तरुणांनी हापूस आंब्याचा व्यवसाय करावा हे आंबे थेट शेतकऱ्यांकडून त्यांना उपलब्ध केले जातील, आणि मिडल मॅन च्या शिवाय शेतकऱ्यांचा आंबा थेट ग्राहकांकडे जाण्यासाठी मराठी तरुण आणि कोकणी तरुण काम करतील अशा स्वरूपाची एक व्यापक योजना राबवत आहे.
ज्यांना ग्लोबल कोकणच्या हापूस आंबा अभियानात सहभागी होऊन अंबा विक्री करायची आहे अशा मराठी कोकणी तरुणांनी आवर्जून संपर्क साधा. ग्लोबल कोकण
विजय. +91 87798 42009