सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात २५ हजार विद्यार्थी
 
					
    मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील २५ हजार विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्ये सामावून घेण्याचं उद्दिष्ट असून यासाठी राज्याच्या विविध भागात सामाजिक न्याय विभाग सव्वाशे वसतिगृह सुरू करणार* असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आज विधानपरिषदेत दिली. यासाठी १५०० कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. मागणी असेल त्या ठिकाणी उत्तम सोयी सुविधांनीयुक्त वसतिगृह सुरू केलं जाईल असं स्पष्ट करीत आदर्श वसतिगृह सामाजिक न्याय विभाग तयार करत आहे,असं शिरसाट यांनी सांगितलं.
वसतिगृहात प्रवेश मिळवण्यासाठीची प्रक्रिया आता मंत्रालय स्तरापर्यंत न ठेवता सामाजिक न्याय आयुक्तांच्या स्तरावर ठेवण्यात आली आहे असं ते म्हणाले. छत्रपती संभाजी नगर शहरातील सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीत असलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याबाबत तारांकित प्रश्न विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विचारला होता.
त्याला उत्तर देताना सामाजिक न्याय मंत्री शिरसाट यांनी वसतिगृहाच्या दूरवस्थेला जबाबदार असलेल्यांवर थेट कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, असं शिरसाट यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाणं सुकर व्हावं यासाठी महाविद्यालयाच्या जवळच वसतिगृहात प्रवेश देण्याबाबत नियमावली तयार करण्यात येईल असं त्यांनी सागितलं.
ML/ML/SL
24 March 2025
 
                             
                                     
                                    