ताडोबा ऑनलाईन बुकींग घोटाळा,१३ कोटींची मालमत्ता
जप्त….

 ताडोबा ऑनलाईन बुकींग घोटाळा,१३ कोटींची मालमत्ताजप्त….

चंद्रपूर, २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ऑनलाईन बुकींग घोटाळ्यातील आरोपी रोहीत विनोद ठाकूर आणि अभिषेक विनोद ठाकूर यांना सक्तवसूली संचालनालयाने (ईडी) दणका दिला आहे. नागपूर आणि चंद्रपूरातील तब्बल १३ कोटी ७१ लाखांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यात स्थावर मालमत्ता आणि बॅंक खात्यातील रकमेचा समावेश आहे.

वाइल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशनचे संचालक रोहीत आणि अभिषेक ठाकूर आहेत. या कंपनीकडे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सफारी बुकींग, प्रवेश शुल्क, जिप्सी शुल्क आणि मागदर्शक शुल्काची रक्कम गोळा करण्याची जबाबदारी होती. सन २०२०-२१ ते २०२३-२४ या कालावधीत त्यांनी १६.५ कोटी रुपयांची अफरातफर केली. ताडोबा प्रकल्पाचे तत्कालीन क्षेत्र संचालक तथा मुख्यवनसंरक्षक डॅा. जितेंद्र रामगावकर यांनी २०२३ मध्ये यासंदर्भात रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ८ एप्रिल २०२४ ला ठाकूर बंधूंना अटक झाली.

न्यायालयाने त्यांना जामीन नाकारला. दोन कोटी ४९ लाख रुपये जमा करण्याचे आदेश दिले. दरम्यानच्या काळात डॅा. रामगावकर यांनी या घोटाळ्याची तक्रार सक्तवसूली संचालनालयाकडे केली होती. मात्र, तत्पूर्वीच ८ जानेवारी २०२५ ला सक्तवसुली संचालनालयाने त्यांच्या चंद्रपुरातील प्रतिष्ठानावर छापा टाकला. त्यात १.४२ कोटींचे सोने, चांदी, प्लॅटिनम आणि महत्वाची कागदपत्र जप्त केली. आता ईडीने १३.७१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

ML/ML/SL

21 March 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *