नाराज वरिष्ठ सदस्यांनी पाडले विधानसभेचे कामकाज बंद

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :विरोधी पक्षाच्या वतीने उपस्थित करण्यात आलेल्या विविध प्रश्नांचा समावेश असणाऱ्या नियम २९३ अन्वयेचे दोन प्रस्ताव सभागृहात चर्चेला आले असता केवळ एक मंत्री उपस्थित असल्यानं त्याला विरोधी सदस्यांनी आक्षेप घेतला, त्यावर सत्तारूढ सदस्यांनी पाठिंबा देत मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थिती बाबत जोरदार आक्षेप नोंदवले यामुळे सभागृहाचे कामकाज आधी
दहा मिनिटांसाठी आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा झाल्यावर नियम २९३ वरील चर्चेची सुरुवात नाना पटोले यांनी केली, त्याचदरम्यान सुनील प्रभू यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे मंत्री आणि अधिकारी उपस्थित नसल्यानं कामकाज तहकूब करण्याची मागणी केली, त्याला भाजपाच्या सुरेश धस यांनी पाठिंबा दिला त्यावर पीठासन अधिकारी दिलीप बनकर यांनी कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले.
कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर मंत्रिपदापासून डावलले गेलेले सत्तारूढ पक्षाचे ज्येष्ठ सदस्य एकत्रित झाले . आधी सुधीर मुनगंटीवार, बबनराव लोणीकर यांनी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीवर आक्षेप नोंदवले.
त्याला विरोधी पक्षाच्या भास्कर जाधव यांनी संसदीय कामकाजाला महत्व दिले जात नाही असं सांगत अधिकारी गॅलरीत बसायची तसदी घेत नाहीत याबद्दल खंत व्यक्त केली, याला सत्ताबाजूच्या अर्जुन खोतकर यांनी देखील या मागणीला पाठिंबा दिला.
अखेर सभागृहातील वातावरण पाहून पीठासन अधिकारी दिलीप बनकर यांनी कामकाज पद्धतीवर आपलाही आक्षेप नोंदवला अधिकारी गॅलरीत उपस्थित राहणार नसतील कामकाज कसं चालवायचं असा सवाल करत त्यांनी आजचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले.
ML/ML/PGB 19 Mar 2025