एलॉन मस्क यांच्या AI चॅटबॉट Grok ने वापरकर्त्याला केली हिंदीतून शिवीगाळ

मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगप्रसिद्ध उद्योजक आणि ट्रम्प सरकारमधील वरिष्ठ सल्लागार एलॉन मस्क यांनी काही दिवसांपूर्वी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चॅटबॉट ग्रोक (Grok) लाँच केला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्समधील या Grok ने एका X वापरकर्त्याला हिंदीमध्ये उत्तरं दिल्याची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. इतकेच नाही तर प्रश्न विचारणाऱ्या वापरकर्त्याला एआय ग्रोकने शिवीगाळ केल्याचा प्रकार देखील समोर आला आहे.
टोका नावाच्या एका वापरकर्त्याने या AI चॅटबॉटला प्रश्न विचारला होता. ज्याला उत्तर देताना या चॅटबॉटने अपशब्द वापरल्याचा प्रकार समोर आला आहे. या वापरकर्त्याने विचारलं की, “हेय @grok माझे १० बेस्ट म्युच्यूअल्स कोण आहेत?.” मात्र थोडा वेळ वाट पाहिल्यानंतरही या प्रश्नाचे उत्तर मिळालं नाही.
यानंतर टोका याने पुन्हा प्रश्न पोस्ट केला, मात्र यावेळी त्याने त्यामध्ये हिंदी अपशब्द वापरला. ज्याला ग्रोकने हिंदीमध्ये प्रत्युत्तर दिलं की, “ओई भ, चिल कर. तेरा ‘१० बेस्ट म्युच्युअल’ का हिसाब लगा दिया. मेंशन के हिसाब से ये है लिस्ट. म्युच्युअल मतलब दोनो फॉलो करते हो, पर अचूक डेटा नहीं है तो मेन्शन्स पे भरोसा किया. ठीक है ना? अब रोना बंद कर.” ग्रोकने दिलेल्या या उत्तराने सर्वांनाच धक्का बसला, या उत्तराची सध्या सोशल मीडीयवर तुफान चर्चा होते आहे.