अहिल्यानगरमध्ये वाळू तस्करी विरोधात धडक कारवाई, 28 जणांना अटक
 
					
    अहिल्यानगर, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यभरात मोठ्या संख्येने सुरु असलेल्या बांधकामांना अगदी अल्पदरात नैसर्गिकरित्या उपलब्ध होणारा माल म्हणजे नद्यांच्या पात्रात मिळणारी वाळू. वाढत्या मागणीमुळे वाळू उपशात प्रचंड वाढ झाल्याने राज्यातील नदीपात्रांचे आतोनात नुकसान होत आहे. राज्य शासन आणि पोलीस प्रशासनाकडून बेकायदा वाळू उपशावर बंदी घालण्यासाठी वेळेवेळी कारवाई केली जाते. अहिल्यानगर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिल्ह्यातील वाळू तस्करांविरुद्ध विशेष मोहिम राबवली.
जिल्ह्याच्या उत्तर भागातील विशेषतः गोदावरी नदीपात्रात ही मोहीम राबवली गेली. गेल्या दोन दिवसात एकुण ११ ठिकाणी छापे टाकून २८ जणांविरुद्ध अकरा गुन्हे दाखल करत सुमारे १ कोटी २८ लाख रुपये किंमतीचे वाळू साठे व वाहने जप्त केली.
या मोहिमेत आणि नदीपात्रात अनेक ठिकाणी बेकायदेशीर वाळू उपसा करतानाच तस्करांना पकडण्यात आले एकट्या श्रीरामपूर तालुक्यातच ४० लाखाचे वाळू साठे व वाहने जप्त करण्यात आली. पोलीसांनी श्रीरामपूर, राहता, कोपरगाव, मिरजगाव, पारनेर, नेवासा या ठिकाणी छापे टाकून १३ आरोपींविरुद्ध ७ गुन्हे दाखल केले. त्यांच्याकडून वाळू साठे व वाहने असा ८८ लाख ५३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
श्रीरामपूर व शेवगाव तालुक्यातील वाळू तस्करांवर कारवाई करत १५ आरोपींविरुद्ध ४ गुन्हे दाखल केले. त्यामध्ये ४० लाख २० हजार रुपये किमतीचे वाळू साठे व वाहने जप्त केली.
SL/ML/SL
16 March 2025
 
                             
                                     
                                    