होळीनिमित्ताने समुद्रात कोळ्यांच्या सुशोभित होड्यांनी वेधलं लक्ष…

अलिबाग दि १४ — आपल्या मच्छीमारी व्यवसायात चांगली बरकत मिळावी आणि दुष्काळ नाहीसा व्हावा अशी मनोभावे प्रार्थना करीत रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांनी होळी साजरी केली. होळीचा उत्सव हा कोळी समुदायासाठी एक मोठा सण. यानिमित्ताने रायगड जिल्ह्यातल्या कोळी बांधवांनी काल आपल्या होड्या पताका लावून तर काहींनी फुलांच्या माळा लावून सजवल्या होत्या. प्रत्येक होडीवर गाण्यांच्या तालावर कोळी बांधवांनी नाचत होळीच्या सणाचा आनंद लुटला. रेवस – करंजा येथील बहुसंख्य कोळी बांधवांनी होळी उत्सवानिमित्त आपल्या पारंपरिक मच्छी व्यवसाय करिता होड्या बोटी यांचे पूजन केले. यावेळी महिला आणि प्रत्येक कुटुंबीयांनी मनोभावे पूजा करून आपल्या मच्छीमारी व्यवसायात चांगली बरकत मिळावी आणि दुष्काळ नाहीसा व्हावा अशी मनोभावे प्रार्थना केली.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील समुद्रकिनारी राहणारे कोळी बांधव हे होळीचा हा सण आपल्या कुटुंबियांसोबत साजरा करतात. महत्वाचे म्हणजे कोळी बांधवांपुढे अनेक संकटे तसेच मच्छीचा दुष्काळ असे अनेक गंभीर प्रश्न असले तरी आपला पारंपारिक सण उत्सवाकरिता एखादा तरी मासा होळीला लावण्याची परंपरा अनेक वर्षाची आहे.वर्षभर खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणारे आगरी – कोळी बांधव हे व्यवसायानिमित्त कुटुंबापासून अनेक दिवस दूर राहतात. पण, होळीच्या या उत्सवानिमित्त मच्छिमार बांधव हे आपल्या होड्या घेऊन घरी परतात. यावेळी, होळीच्या दिवशी या मच्छिमार होड्यांची पूजा करण्यात येत असून यानिमित्ताने कुणी होड्याना रंगीबेरंगी पताकांचे तोरण लावून सजवल्या तर कुणी होड्यांना फुलांच्या माळा लावल्या होत्या.
होळीच्या निमित्ताने होडीच्या पुढच्या नाळीवर मोठे मासे बांधले जातात आणि मच्छिमार बांधव हे आपल्या कुटुंबासोबत नजीकच्या समुद्रात सफरीसाठी जातात. यावेळी, घरातील बच्चेकंपनी आणि महिला सुद्धा नटून- थटून या सफरीमध्ये सामील होतात. तर, होळीच्या या सणानिमित्त हे मच्छिमार बांधव बोटीमध्ये गाण्यांच्या तालावर नाच करीत एकमेकांना रंग लावीत आपला आनंद साजरा करतात.यावेळी, बच्चेकंपनी आणि तरुण हे दुसऱ्या बोटीतील कुटुंबियांवर रंग फेकत होळीचा आनंद घेत असतात.