ठाण्यात रंगणार श्रमिक कलावंतांचा कला महोत्सव

 ठाण्यात रंगणार श्रमिक कलावंतांचा कला महोत्सव

ठाणे दि १४– महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल कलांचा कला महोत्सव ठाण्यात रंगणार आहे. बाळासाहेब ठाकरे कलादालन, रविवार १६ मार्च आणि सोमवार १७ मार्च दरम्यान श्रमिक कलावंतांच्या कलांनी थिरकणार असून कचरा वेचक, सफाई सेविका, घरकाम करणाऱ्या महिलांसह तृतीयपंथी, तमाशा कलावंत, गोंधळी, संबळ वादक, अंध दिव्यांग, पोतराज, वासुदेव, कोळी बांधव, तारपा कलावंत असे जवळपास १०० हून अधिक श्रमिक कलावंत या कलामहोत्सवात कला सादर करणार आहेत.

सांस्कृतिक कार्यविभाग महाराष्ट्र शासन, महाराष्ट्रातील श्रमिकांच्या सांस्कृतिक एकीकरणासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहाच्या सांस्कृतिक जीवनाशी जोडण्यासाठी विविध उपक्रम राबवित असते. याच श्रृखंलेचा एक भाग म्हणून ठाण्यात २ दिवसीय श्रमिकांच्या कलांचा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्‍घाटन सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत होणार आहे. कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार संजय केळकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कला महोत्सवाचे संयोजन समर्थ भारत व्यासपीठ ही संस्था करत आहे.

श्रमिकांच्या कलांच्या महोत्सवाची सुरुवात रविवार सकाळी ९ वाजता श्रमिकांच्या कला दिंडीने होणार असून जुने ज्ञानसाधना महाविद्यालय, परबवाडी मैदान येथून दिंडीची भव्य सुरुवात होऊन दिंडी बाळासाहेब कलादालनापर्यंत निघणार आहे. यानंतर सकाळी १० वाजता बाळासाहेब ठाकरे कलादालनातील श्रमिकांच्‍या कला प्रदर्शनाचे आणि श्रमिकांच्या कला उत्सवाचे उद्‍घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होईल अशी माहीती सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी दिली. उद्‍घाटनाच्या कार्यक्रम प्रसंगी श्रमिक आणि श्रमिकांच्या कलाविकासासाठी योगदान देणाऱ्या ६ सत्कार मूर्तीचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. उद्‍घाटनाच्या कार्यक्रमानंतर सलग २ दिवस महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील कलावंत आपापल्या कलांचे सादरीकरण करणार आहेत. सकाळी १० ते रात्रौ ८ असा हा महोत्सव रंगणार असून सर्व कलारसिकांसाठी प्रवेश विनामूल्य आहे.

रविवारी दुपारी ३ वाजता बेघर एकल पालक अंध दिव्यांग मुलांच्या कलाविष्काराने महोत्सवाची सुरुवात होईल. ठाण्यातील ज्येष्ठ संबळ वादक, पोवाडा गायकांचे कलासादरीकरण दुपारी ३.३० वाजता सुरु होईल. तर घराकम करणाऱ्या सेविकांचा अनोखा मंगळागौरचा कार्यक्रम रसिकांना सायं ५ वाजता पाहता येईल. सायंकाळी ६.०० वाजता तृतीय पंथी कलावंतांनी सादर केलेले घुंगरू नृत्य पाहता येईल. कचरा वेचक आणि सफाई सेविकांचा बहारदार नृत्याविष्कार , पारंपरिक कोळी नृत्याने पहिल्या दिवशीचा कलामहोत्सव रंगेल. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात सकाळी १० वाजता वारकरी आणि वासुदेवांच्या धार्मिक मांदियाळीने होईल. नंतर ११ वाजता सिग्नल शाळेचे विद्यार्थी, परिवर्तन संस्थेच्या विद्यार्थींनीचा नृत्याविष्कार पाहता येईल. दुपारी १२ वाजता ठाण्याच्या मातीतील बहारदार तारपा नृत्य रसिकांना अनुभवता येईल. दुपारी २ वाजता मावळ येथील तृतीयपंथी कलावंत घडा नृत्य , समई नृत्य सादर करतील. तर दुपारी ३ वाजता पारनेर, श्रीरामपूर, अहिल्यानगर येथील कलावंत खंडोबाचा आणि देवीचा गोंधळ घालतील. सायं. ४.३० वाजता आष्टी येथील लोकनाट्य तमाशा मंडळातील पारंपरिक गण, गवळण, सादर करतील. सायं. ५.३० वाजता जुन्नर येथील कलाकार ढोल, झांज ताशांच्या नादात भलर हा कलाप्रकार सादर करतील. महोत्सवाचा समारोप दिव्यांग कलाकेंद्राच्या वाद्यवृदांने होईल. यात अंध, दिव्यांग मुले भावगीते, भक्तीगीते, लोकगीते सादर करतील. तरी श्रमिकांच्या या कलामहोत्सवाला जास्तीत जास्त ठाणेकर नागरिकांनी उपस्थित रहावे आणि कलाकारांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन संयोजक समर्थ भारत व्यासपीठाच्या वतीने करण्यात आलेले आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *