सीमा भागातील गावांनाही मुख्यमंत्री आर्थिक मदतीचा लाभ

मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील गरजू नागरिकांसह सीमा भागातील नागरिकांना आरोग्य विषयक समस्यांमध्ये मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष कटिबद्ध आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कक्षाच्या माध्यमातून सीमावर्ती भागातील गावांना सातत्याने आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते. ही मदत अधिक सुलभरित्या कशी पोहोचवता येईल यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली.महाराष्ट्र एकीकरण समितीचे वैद्यकीय मदत प्रमुख आनंद आपटेकर यांनी मंत्रालयात कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत सीमा भागातील नागरिकांना वैद्यकीय सहाय्यता अधिक सुलभ आणि जलदगतीने मिळावे यासाठी त्यांनी विनंती केली.
दरम्यान, सद्यस्थितीत कक्षाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सहाय्यतेबाबत समाधानही आपटेकर यांनी व्यक्त केले.नाईक म्हणाले, मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून अधिकाधिक गरजू रुग्णांना तातडीने आणि पारदर्शक पद्धतीने मदत मिळावी, यासाठी नवे निर्णय घेण्यात आले आहेत. आजारांचे पुनर्विलोकन, आर्थिक सहाय्याची नव्याने निश्चिती आणि रुग्णालय संलग्नीकरणासाठी निकष ठरवण्यासाठी विशेष समिती गठीत करण्यात आली आहे. याबाबत शासनाने शासननिर्णय जारी केला असून, त्याची अंमलबजावणी झाली आहे. सीमावर्ती भागातील जे रुग्णालय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाशी संलग्नित आहेत अशा रुग्णालयांमध्ये दाखल रुग्णांना कक्षामार्फत मदत करण्यात येते.
येत्या काळात सीमावर्ती भागातून ज्या रुग्णालयांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाशी संलग्नित होण्यासाठी अर्ज केले आहेत त्याबाबत प्राधान्याने कार्यवाही केली जाईल. सीमा भागातील रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी नवीन रुग्णालयांचे संलग्नीकरण करण्याचे काम हाती घेतल्याचे नाईक यांनी सांगितले.*नवीन कार्यप्रणालीच्या प्रचार-प्रसारासाठी विशेष जनजागृती मोहीम*मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय कक्षाच्या नवीन कार्यपद्धतीची माहिती सीमा भागातील अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लवकरच विशेष मोहिम राबवण्यात येणार आहे. सीमा भागातील गरजू रुग्णांना त्वरित मदत मिळावी यासाठी शासन कटीबद्ध असून, या नव्या कार्यपद्धतीमुळे निधीचे वितरण अधिक प्रभावी तथा सुलभ होईल, असे नाईक यांनी सांगितले. मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना आर्थिक मदत पुरविण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी सतत प्रयत्न सुरू आहेत.
सीमा भागात आरोग्य शिबिरे देखील राबविली जात आहेत. कक्षाच्या या पुढाकारामुळे सीमा भागातील नागरिकांना आरोग्यविषयक समस्यांमध्ये दिलासा मिळेल असा आशावाद नाईक यांनी व्यक्त केला. राज्यातील तसेच सीमा भागातील रुग्णांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षा संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कक्षाच्या ९३२११०३१०३ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन नाईक यांनी केले.
SL/ ML/ SL
13 March,2025