स्मशानात धगधगली दुर्गुणांची होळी! ‘स्मशान होलिकोत्सव’ साजरा

वाशीम, दि १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाशीमच्या मोक्षधाम स्मशानभूमीत यंदाही दारू, गुटखा आणि प्लास्टिकच्या होळीने समाजप्रबोधनाचा संदेश देण्यात आला. संकल्प मल्टिपर्पज फाउंडेशनतर्फे सलग १९ व्या वर्षी ‘स्मशान होलिकोत्सव’ साजरा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत केवळ होळी पेटवली गेली नाही, तर दोन तासांचे स्वच्छता अभियान राबवून स्मशानभूमीही स्वच्छ करण्यात आली.यावेळी गुटखा, सिगारेट, तंबाखू, दारू, प्लास्टिक पिशव्या आणि गाजरगवत एकत्र करून त्यांची होळी करण्यात आली.
हा आगळा-वेगळा उपक्रम समाजातील व्यसनमुक्ती आणि स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी राबविला जातो. दरम्यान,तरुणाई व्यसनांपासून दूर राहावी, समाजात स्वच्छता आणि चांगल्या विचारांचा प्रचार व्हावा, हा आमचा उद्देश आहे’, असे संकल्प फाउंडेशनचे अध्यक्ष सुशील भिमजियाणी यांनी सांगितले.
या वेळी फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांसह अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते. अशा प्रकारच्या सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांमुळे होळीचा सण आणखी अर्थपूर्ण होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
ML/ML/SL
13 March 2025