शिक्षिकेनं घरी तपासायला नेल्या बारावीच्या उत्तरपत्रिका आगीत जळून खाक

येत्या आठवड्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपणार आहेत. निकाल लवकर लावण्यासाठी बोर्डाकडून हालचाली सुरू आहे. 15 मेपर्यंत निकाल जाहीर होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. यासाठी उत्तरपत्रिकांच्या तपासणीचं काम वेगानं सुरू आहे. दरम्यान, मुंबईच्या विरारमध्ये 12 वीच्या उत्तरपत्रिका जळाल्याची घटना समोर आली आहे. १२वी कॉमर्सच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी घरी घेऊन आलेल्या शिक्षिकेच्या घरात उत्तर पत्रिकांना आग लागली. विरार पश्चिम येथील गंगुबाई अपार्टमेंट, नानभाट रोड, बोळींज, आगाशी परिसरात राहणाऱ्या शिक्षिकेच्या घरी ही घटना घडली आहे. या शिक्षिकेने १२ वी कॉमर्सचे पेपर रीचेकिंग साठी घरी आणले होते. घर बंद असताना अचानक शॉर्ट सर्किट झाला आणि आग लागली. त्यामध्ये घरातील इतर सामानासहित विद्यार्थ्यांच्या बारावी कॉमर्सच्या उत्तरपत्रिकाही जळून खाक झाल्या आहेत. या घटनेचा अधिक तपास विरार पोलिस करत आहेत.