राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून मुंबईत

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होत असून दोन वादग्रस्त मंत्र्यांचे राजीनामे होतात का आणि राज्याच्या तिजोरी वरती आलेला मोठा आर्थिक भार याच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन होत असून विरोधक मंत्र्यांचे राजीनामे मागणे किती लावून धरतात यावर हे अधिवेशन किती वादळी ठरते हे अवलंबून असणार आहे.
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने दोन वर्षाची सजा सुनावल्यानंतर त्यांचा राजीनामा तातडीने घ्यावा अशी मागणी विरोधक सातत्याने करत आहेत मात्र सत्र न्यायालयाने त्यांना तात्पुरता दिलासा दिल्यामुळे अद्याप आमदारकी वाचली असून त्यांचा राजीनामाही झालेला नाही तर राष्ट्रवादीचे दुसरे मंत्री धनंजय मुंडे हे देखील संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर जोरदार वादाच्या भोवऱ्यात सापडले असून त्यांचे सहकारी या प्रकरणात अटक झाल्यामुळे विरोधकांनी आणि सत्तारूढ पक्षाच्या आमदारांनी त्यांना चांगलेच घेरले आहे. त्यातच मुंडे यांच्या कथित पत्नी करुणा शर्मा यांनी देखील धनंजय मुंडे यांना वारंवार अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे.
दुसरीकडे गेल्या निवडणुकीत जोरदार चर्चेत आलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अमलात आणण्याकरता राज्याच्या तिजोरीवर मोठ्या प्रमाणावर भार पडला असून त्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. या योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर पैसा लागत असून त्यासाठी अन्य खात्यातील पैसे या ठिकाणी वर्ग करण्यात आलेले आहेत. यामुळे अन्य खात्यातील मंत्र्यांची नाराजी मोठ्या प्रमाणावर असून लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणींना त्यांचे हप्ते सुलभ मिळावेत यासाठी पैसे जमवणे हे अर्थ खात्यासमोरील मोठे आव्हान बनले आहे.
वित्तमंत्री म्हणून अजित पवार यांना यावेळचा अर्थसंकल्प सादर करताना मोठ्या प्रमाणात तारेवरची कसरत करावी लागणार असून राज्याची वाढलेली राजकोषीय तूट भरून काढणे हे त्यांच्या समोरील मोठे आव्हान आहे. तर राज्याची अर्थव्यवस्था कोणत्या दराने प्रगती गाठेल हे देखील पाहणे गरजेचे असणार आहे. त्यासाठी अर्थसंकल्पाच्या आधी मांडण्यात येणारा आर्थिक पाहणी अहवाल राज्याची नेमकी स्थिती दर्शवणार आहे. यातूनच राज्याची सद्य आर्थिकस्थिती काय आहे याची कल्पना संपूर्ण राज्याला येणार आहे.
या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती तिन्ही पक्षांमध्ये काही प्रमाणात नसकेला समन्वय, नाराज असलेल्या एकनाथ शिंदे यांच्याबद्दलची चर्चा, नाशिक तसेच रायगड या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा प्रश्न अद्याप अनुतरीत आहे. यामुळे सत्तारूढ पक्षामध्ये सर्व काही आलबेल नाही. मात्र विरोधक तितकेसे प्रभावी नसल्याने हे अधिवेशन वादळी ठरते की सत्तारूढ पक्षातील अंतर्गत कलह यामुळे हे अधिवेशन गाजते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
ML/ML/PGB 2 Mar 2025