स्वारगेट बलात्कार प्रकरणातील नराधमाच्या मुसक्या आवळल्या

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला काल रात्री उशिरा पुणे पोलिसांनी अटक केली. दत्ता भीतीने कॅनॉलमध्ये लपून बसला होता. अखेर त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. त्याला अटक करून लष्कर पोलीस ठाण्यात दाखल केले गेले. आज दुपारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी गाडेला 12 मार्च पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे माननीय न्यायालयाने आदेश दिले आहेत.
आरोपी दत्तात्रय गाडे फरार असताना त्याने शेतात आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला असल्याचे समजते. मात्र गळफास घेतलेला दोर तुटल्याने जीव वाचला. आत्महत्या करण्याचे साहित्य देखील घटनास्थळी सापडले आहेत. या संदर्भातील माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच ज्यांच्या मदतीने आरोपी मिळाला त्यांना 1 लाखांचे बक्षीस देणार असल्याचे अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे.
दोघांमध्ये संमतीने शारीरिक संबंध असल्याचा दावा आरोपीच्या वकिलाने केला आहे. कोणताही प्रतिकार केला नाही, तरुणी स्वत:हुन बसमध्ये चढली, असाही दावा आरोपीच्या वकिलाने केला आहे. तर सरकारी वकिलांनी आरोपीवरील गुन्ह्यांची माहिती कोर्टात दिली आहे.
पिडीतेवर आरोपीने दोनवेळा बलात्कार केला. तसेच तिला आपण बसचा वाहक असल्याचे सांगीतले होते, अशी माहिती पोलिसांनी कोर्टात दिली असून १४ दिवसांची पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली आहे. तसेच आरोपीवर ६ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपीने अनेकवेळा आपण पोलिस असल्याचे सांगत तरुण मुलींना फसवण्याचा प्रयत्न केला आहे. विकृतीमधूनच आरोपी हा ऐवज हेरण्याचा प्रयत्न करायचा. तसेच आरोपी दत्तात्रय गाडे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे, अशी माहिती पोलिसांनी कोर्टात दिली
ML/ML/PGB 28 Feb 2025