वासुदेव संतु गायतोंडेची चित्रकला सातासमुद्रापार

मुंबई, दि. 21 (एम एमसी न्यूज नेटवर्क) – चित्रकला ही मानवी भावभावनांना आणि विचारांना अभिव्यक्त करणारी एक सशक्त कला आहे. याच कलेच्या माध्यमातून वासुदेव संतु गायतोंडे यांनी जागतिक पातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या कलेची महती जगभर पोहोचली असून, आता ती पुस्तक रूपाने प्रकाशित होत आहे.अशी माहिती चिन्हचे संस्थापक-संपादक सतीश नाईक व भाषांतरकार शांता गोखले यांनी मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला कार्यकारी संपादक विनिल बुरखे, समूह संपादक डॉ. मंजिरी ठाकूर उपस्थित होते.
चिन्ह पब्लिकेशन्सने गायतोंडे यांच्या जीवनावर आधारित एक विस्तृत ग्रंथ प्रकाशित करण्याची घोषणा केली आहे. या पुस्तकाचे प्रकाशन २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या हिरवळीवर होणार आहे. या प्रकाशन सोहळ्याला पद्मभूषण डॉ. नंदकिशोर लाड, पद्मश्री डॉ. सरयू दोशी, डॉ. फिरोजा गोदरेज, प्रयाग शुक्ला, पद्मश्री कुमार केतकर आणि सुप्रसिद्ध अभिनेते अमोल पालेकर उपस्थित राहणार आहेत.
गायतोंडे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांच्या कार्याचा शोध घेण्यासाठी ‘चिन्ह’ मासिकाच्या संस्थापक-संपादक सतीश नाईक यांनी विशेष अंक प्रकाशित केला होता. यामध्ये त्यांच्या कुटुंबीय, मित्रमंडळी आणि सहकाऱ्यांनी लिहिलेल्या लेखांचा समावेश होता. हाच विशेष अंक विस्तृत ग्रंथाच्या निर्मितीची प्रेरणा ठरला.
गायतोंडे यांच्या कलेवर झेन बुद्धीझम आणि आध्यात्मिक विचारांचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या या प्रवासाचा सखोल अभ्यास करत सतीश नाईक यांनी अनेक महिने संशोधन केले. या पुस्तकात त्यांच्या कलेशी संबंधित माहिती, त्यांचे कुटुंबीय, सहकारी, तसेच त्यांच्या अध्यात्मिक प्रवासावर प्रकाश टाकणारे लेख आणि छायाचित्रे समाविष्ट आहेत.
गायतोंडे यांच्या कार्याचा व्यापक विस्तार लक्षात घेऊन या पुस्तकाची इंग्रजी आवृत्तीही प्रकाशित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रसिद्ध लेखिका शांता गोखले यांनी या पुस्तकाचा अनुवाद केला आहे. इंग्रजी आवृत्तीमध्ये १ लाखापेक्षा जास्त शब्द, मुलाखती, १२० चित्रे, २० पोर्ट्रेट्स आणि ७४ दुर्मिळ छायाचित्रे समाविष्ट आहेत.
हे पुस्तक कलासंग्राहक आणि कलाप्रेमींसाठी एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ ठरणार आहे. तसेच, नव्या पिढीतील कलाकारांसाठीही हे पुस्तक प्रेरणादायी ठरेल. २७ फेब्रुवारीपर्यंत प्रकाशनपूर्व सवलतीच्या दरात हे पुस्तक उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे विनिल बुरखे यांनी सांगितले.
ML/ML/SL
21 Feb. 2025