विकी कौशलचा ‘छावा’ चित्रपट मराठीत डब होणार
मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :विकी कौशलच्या ‘छावा’ सिनेमाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. सगळीकडेच सिनेमाचे शो हाऊसफूल होत आहेत. छावा चित्रपटाच्या टिमने प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. छावा आता मराठीतही येणार आहे. सांस्कृतिक मंत्री उदय सामंत यांनी याबाबत माहिती दिली आहे. उदय सामंत यांनी नुकतीच ‘छावा’ सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांची भेट घेतली. ‘छावा’ सिनेमा मराठीत डब करून प्रदर्शित करण्यात यावा अशी विनंती उदय सामंत यांनी लक्ष्मण उतेकर यांना केली. ही विनंती लक्ष्मण उतेकर यांनी मान्य केली असून लवकरच हा सिनेमा मराठीतही प्रदर्शित होणार असल्याचं सांगितलं आहे. याबाबत उदय सामंत यांनी ट्वीट केलं आहे.