तब्बल 18 हजार फुटावर साकारली महाराजांची हरित रांगोळी

अकोला दि १९:– छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंतीनिमित्त अकोला जिल्हयातील अकोट येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात चतुर्भुज आर्ट्सचे रांगोळी कलाकार अनिल काळे आणि श्री शिवाजी महाविद्यालयाच्या माध्यमातून तब्बल 18 हजार स्क्वेअर फुटावर गहू आणि मोहरीच्या सहाय्याने छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य हरित रांगोळी साकारण्यात आली आहे .ड्रोन कॅमेऱ्यातून दिसणारी ही हरित रांगोळी तब्बल 18 हजार स्क्वेअरफूट आकारात साकारण्यात आली असून यासाठी चार क्विंटल गहू आणि 35 किलो मोहरीचा वापर करण्यात आला असून हरित रांगोळी साकारण्यासाठी 25 विद्यार्थ्यांना 15 दिवसांचा अवधी लागला आहे. अकोला जिल्ह्यात पहिल्यादांच 18 हजार फुटांची हरित रांगोळी साकारण्यात आली असून रांगोळी पाहण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करत करीत आहेत. शिवरायांची भव्य रांगोळी काढण्याचे भाग्य लाभल्याने जीवन सार्थकी झाल्याची भावना रांगोळी कलाकार अनिल काळे यांनी व्यक्त केली.विशेष म्हणजे यापूर्वीही अनिल काळे यांनी 15 हजार स्वेअर फुटांची रांगोळी शिवराज्याभिषेक दिनाला साकारली होती. शिवजयंतीच्या निमित्ताने अकोट येथील श्री शिवाजी महाविद्यालयात शिवसप्ताह साजरा केला जात असून शिवकालीन महत्त्वाच्या घटनांचे महत्व अधोरेखित करणारे शिवसृष्टी दर्शन, शिवकालीन शस्त्र प्रदर्शनि,मर्दानी खेळ,लोकसंकृती दर्शनासह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील पांडे यांनी दिली. हिंदवी स्वराज्याची प्रेरणा प्रत्येकाच्या मनात जागणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज्यांची जयंती आज जगभरात साजरी होत प्रत्येक जिल्ह्यात जय शिवाजी जय भारत पदयात्रेचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणाली द्वारे करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना कायम केंद्रस्थानि ठेवून विविध शेती तसेच शेतकरी समृद्ध करण्यासाठी कार्य करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजाना अकोट येथे हरित रांगोळीद्वारे अनोखे अभिवादन केले जात आहे.