शिवजयंती : छत्रपती पुतळ्यांमध्ये नाही, तर आचरणात हवे, शिवसंस्कार मनात रुजवायला हवा

राधिका अघोर
शिवरायांचे आठवावे रूप ।शिवरायांचा आठवावा प्रताप ।शिवरायांचा आठवावा साक्षेप ।भूमंडळी ।।१।।
छत्रपती शिवाजी महाराजांची 395 वावी जयंती आपण सगळे केवळ महाराष्ट्रातच नाही, तर संपूर्ण भारतभरात आणि जगातही अनेक ठिकाणी साजरी करतो आहोत. आणि पुढेही युगानुयुगे ही शिवजयंती साजरी करणारच आहोत. असा स्वयंभू, पराक्रमी, श्रीमंत योगी, राजा आपल्याला लाभला, हे खरोखरच आपलं भाग्य आहे. सुमारे 400 वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या राजांचे कार्य आणि कारकीर्द आजही आपल्याला प्रेरणा देते, आपला स्वाभिमान जागृत ठेवते, हीच छत्रपतींच्या कालातीत अस्तित्वाची खूण आहे. त्यांचे विचार आजही आहेत आणि पुढेही राहणार आहेत. त्याहीपेक्षा, भारताचे एक मोठे तमोयुग संपून कित्येक वर्षांनी हिंदू राजाचे हिंदवी स्वराज्य स्थापन झाले होते. अनेक शतकांच्या अत्याचारातून रयतेची सुटका झाली होती. आणि आपलं राज्य, आपली भूमी ही भावना सर्वसामान्यांच्या मनात प्रज्वलित झाली होती. छत्रपतींच्या कारकिर्दीवर लिहिण्यासाठी तर ग्रंथ ही पुरेसा नाही. पण आज आपण जी शिवजयंती साजरी करतो आहोत, त्याविषयी थोडक्यात सांगता येईल.
शासकीय पातळीवर दरवर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होते. यंदा शिवनेरीवर मोठा शिवजन्मोत्सव सोहळा होत आहे. तीन दिवसांचा हिंदवी स्वराज्य महोत्सवही तिथे भरवण्यात आला आहे. त्यातून शिवरायांच्या प्रेरणेची, त्यांच्या विचारांची गाथा तरुणांपुढे मांडली जाते आहे. त्याशिवाय आज राज्यातल्या सर्व 36 जिल्ह्यांमध्ये, जय शिवाजी, जय भारत अशा पदयात्रा निघणार आहेत. पुण्यात होणाऱ्या पदयात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवी सहभागी होणार आहेत. यात 20 हजार पेक्षा जास्त तरुण सहभागी होत आहेत. या यात्रेत, ऐतिहासिक दुर्ग किल्ल्यांची साफसफाई, शिव व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. राज्यात सगळीकडे, अगदी सगळ्या गावात शिवजयंती साजरी होते आहे, विविध कार्यक्रम होत आहेत.
छत्रपतींच्या कर्तृत्वाचा हा सन्मान, त्यांचं स्मरण खरोखर आनंददायी आहे. पण ज्या उत्सवी स्वरूपात ही शिवजयंती साजरी होते, त्यावरून एक प्रश्न पडतो, की आपण त्यांना ” देव ” केलं आहे का? छत्रपती आपले दैवत आहेत, यात काहीच दुमत नाही. मात्र आपण कोणीही देव पाहिला नाही, त्याची कल्पना केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज दैवी गुण असलेले अलौकिक पुरुष होते, त्यांचे कार्य कर्तृत्व सुदैवाने आपल्याला काही ना काही स्वरूपात बघायला उपलब्ध आहे. अशावेळी, आपण केवळ त्यांच्या प्रतिमा आणि उत्सवात अडकून न बसता, त्यांचे गुण, शौर्य आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो का? आपण त्यांच्या राज्यकारभाराची पद्धत, त्यांचे आदेश वाचतो का? आपल्या आयुष्यात त्याची अंमलबजावणी करतो का? हा प्रश्न आहे.
छत्रपती शिवराय शत्रूच्या स्त्रियांनाही सन्मान देत असत. जर वर्षानुवर्षे महाराष्ट्रात प्रत्येक गावात शिवजयंती साजरी होते आहे, तर त्यांच्या ह्या राज्यात महिलांवर अत्याचार कसे होतात? आपण आपल्या मनावर, चारित्र्यावर हा शिवसंस्कार केला आहे का? केला असेल, तर त्यांच्या भूमीतल्या एकाही व्यक्तीकडून असा गुन्हा घडणार नाही. तेव्हा शिवजयंती साजरी करण्यासोबत, त्यांच्या विचारांचा शिवसंस्कार घरी, दारी, शिक्षणातून प्रत्येक मुलाच्या मनावर बिंबवायला हवा. छत्रपतींच्या महाराष्ट्रातला युवा जातपात मानणारा कसा असतो? कुणाच्यातरी मेहेरबानीने मला नोकरी मिळेल, म्हणून वाट पाहत पान टपरीवर टाईमपास करणारा कसा असतो? एक दिवसा शोभायात्रेत सहभागी होऊन शिवजयंती साजरी केली की संपली त्यांच्यावरची निष्ठा, प्रेम? जसं त्यांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केलं, तसं आपण शून्यातून किमान आपलं विश्व निर्माण करू शकत नाही का? याचा विचार करायला हवा. आपल्या आयुष्याची संपूर्ण राख रांगोळी करून स्वराज्य उभारणारे शिवाजी महाराज, ते हिंदवी स्वराज्य राखण्यासाठी, स्वधर्म संरक्षणासाठी बलिदान देणारे छत्रपती संभाजी महाराज, यांचं स्मरण केवळ प्रेरणादायी किंवा अस्मिता जागवणारे नसावे, तर आपण त्यांच्या तेजाचा शतांश तरी आपल्यात आणू शकतो का? ह्या भूमीसाठी, काहीतरी देऊ शकतो का? हा विचार करायला हवा. तरच, शिवजयंती साजरी करणं खऱ्या अर्थाने उत्सव ठरेल. शेवटी, रामदास स्वामींच्याच शब्दांत, छत्रपतींना वंदन करुन,शिवजयंतीच्या शुभेच्छा ! निश्चयाचा महामेरू ।बहुत जनांसी आधारू ।अखंड स्थितीचा निर्धारु ।श्रीमंत योगी ।