नवी मुंबई परिवहनमधील कंत्राटी कामगारांना मिळणार वेतनवाढ

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवी मुंबई महानगरपालिका आणि नवी मुंबई परिवहन सेवेमध्ये कार्यरत विविध संवर्गामधील कंत्राटी, ठोक, रोजंदारी, सहा महिने नियुक्ती, करार पद्धत तत्वावरील कामगारांची वेतनवाढ आणि त्यांच्या अन्य सुविधांबाबतचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. कामगार मंत्र्यांनी याबाबत तसे आदेश दिले आहेत.
कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावर श्रमिक सेनेने मागणी केल्यानुसार श्रमिक सेनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार संजीव नाईक यांची कामगारमंत्री आकाश फुंडकर यांच्या समवेत मंत्रालयात काल बैठक पार पडली. यामध्ये नवी मुंबई महापालिका आयुक्त यांनी आवश्यक कारवाई करून कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आदेश फुंडकर यांनी यावेळी दिले.
या बैठकीला कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय ए कुंदन, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त कैलास शिंदे, कामगार आयुक्त एच पी तुमोड, कामगार उपायुक्त प्रदीप पवार यांच्यासह संबंधित विभागाचे उच्च अधिकारी उपस्थित होते. श्रमिक सेनेच्या वतीने सरचिटणीस चरण जाधव, सुरज पाटील, विजय साळे हे पदाधिकारी उपस्थित होते.
नवी मुंबई महापालिकेमध्ये सुमारे 8000 साफसफाई कर्मचारी ठेकेदारांमार्फत कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत. तर नवी मुंबई परिवहन मध्ये 1400 आणि महापालिकेमध्ये 1000 असे कर्मचारी हे ठोक मानधन, रोजंदारी, आणि सहा महिने नियुक्ती तत्वावर कार्यरत आहेत. यामध्ये स्वच्छता कर्मचारी, शिक्षक, परिचारिका, अभियंता, डॉक्टर, वाहक, चालक, आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा आणि अन्य संवर्गातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. परंतु 2010 पासून या कर्मचाऱ्यांना मिळणारे वेतन तुटपुंजे आहे. या कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळावेत त्यासाठी श्रमिक सेनेने आजपर्यंत सर्वात जास्त यशस्वी प्रयत्न केले आहेत.
कंत्राटी कामगारांच्या वेतन वाढीच्या प्रश्नावर श्रमिक सेनेने राज्याचे वने मंत्री गणेश नाईक यांना विनंती केली होती. त्यानुसार नाईक यांनी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या समवेत श्रमिक सेना शिष्टमंडळाची बैठक घडवून आणली. या बैठकीमध्ये श्रमिक सेनेचे अध्यक्ष संजीव नाईक यांनी मुद्देसूदपणे कंत्राटी कामगारांच्या वेतन वाढीचा आणि अन्य सुविधांचा विषय उपस्थित केला. या कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या समर्थपणे पेलता याव्यात यासाठी न्यायपूर्ण वेतन वाढीची आग्रही मागणी केली. ही वेतन वाढ नियमाप्रमाणे नियमित झाली पाहिजे, अशी मागणी देखील केली. या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी पालिका प्रशासनाने कंत्राटी कामगारांच्या वेतन वाढीसाठी नियुक्त केलेल्या श्रीवास्तव समितीचा अहवाल एका आठवड्यात सादर करण्याचे निर्देश दिले.
महापालिका ही स्वायत्त संस्था असल्याने त्यांनी हा अहवाल प्राप्त होताच पुढच्या एका आठवड्यात वेतन वाढीचा निर्णय घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा, असे महापालिका प्रशासनाला आदेशित केले. नवी मुंबई महापालिकेत कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या अधिक असल्याने हा निर्णय फक्त नवी मुंबई महापालिकेला लागू होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कंत्राटी कामगारांच्या हिताच्या शासन निर्णयासाठी श्रमिक सेनेचे अध्यक्ष संजीव नाईक यांनी कामगार मंत्री फुंडकर यांचे आभार व्यक्त केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुतीचे सरकार कामगारहित साधणारे सरकार आहे, असेही नाईक म्हणाले. कंत्राटी कामगारांच्या वेतन वाढीचा निर्णय लवकरच होणार असल्याने या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
नवी मुंबई महापालिकेतील काही कामगार संघटनांनी नवी मुंबईकरांना वेठीस धरण्याचे काम केले परंतु श्रमिक सेनेने कामगारांच्या जिव्हाळ्याचा विषय अतिशय सनदशीर मार्गाने मांडून तो सोडविण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. जनतेला त्रास न होता कामगारांचेही प्रश्न सुटले पाहिजेत अशी सुवर्णमध्य भूमिका श्रमिक सेनेची आहे.
ML/ML/SL
18 Feb. 2025