राजन साळवी यांचा अखेर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

ठाणे, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानसभा निवडणूकीत पिछेहाट झालेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा एकदा एक जोरदार धक्का बसला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे निष्ठावंत समजले जाणारे, उपनेते, राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षात प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. पक्षाने योग्य साथ दिली नाही तसेच पक्षातीलच काही लोकांनी विरोधात काम केल्याची त्यांची भावना असल्याने मागील काही दिवसांपासून ते नाराज होते. अखेर आज राजन साळवी यांनी ठाणे येथे उपमुख्यमंत्री व शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदे हे आपले राजकीय गुरु असल्याचे राजन साळवी यांनी म्हंटले आहे. ठाणे येथील आनंद आश्रमात राजन साळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह स्वर्गीय आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले.
विधानसभा निवडणुकीत विनायक राऊत यांनी मदत न केल्यामुळे त्यांच्याशी झालेल्या वादात उद्धव ठाकरे यांनी राऊतांची बाजू घेतल्यामुळे साळवी दुखावले गेले होते. यामुळे आतापर्यंत एकनिष्ठ असलेल्या साळवी यांनी शिवसेनेला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला. पराभवानंतर नाराज झालेले राजन साळवी हे भाजपमध्ये जाण्याची जोरदार चर्चा होती. मात्र त्यांनी शिंदे गटाची कास धरण्याचा निर्णय घेतला आहे. राजन साळवी यांच्या जाण्याने ठाकरे गटाला कोकणात मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे कोकणात ‘ऑपरेशन टायगर’ला सुरुवात झाल्याची चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे. माजी आमदार राजन साळवी यांनी नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हाप्रमुख, तीन वेळा आमदार, आता उपनेता अशा विविध पदांवर काम केले आहे.
पक्षात प्रवेश केल्यानंतर राजन साळवी म्हणाले, “९ तारीख या दिवशी भाईंचा वाढदिवस असतो. त्या दिवशी मी भाईंना भेटलो आणि म्हणालो की या शुभ दिवशी मला आता पक्षात यायचे आहे. त्यावेळी माझ्यासोबत रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. कुटुंबातला सदस्य म्हणून भाईंनी माझ्यावर प्रेम केले. एक छोटा भाऊ म्हणून मला त्यांनी मार्गदर्शन दिले. एक दुःख आहे नक्कीच भाई मुख्यमंत्री होत असताना मी त्यांच्या सोबत राहू शकलो नाही.”
SL/ML/SL
13 Feb. 2025