ट्रोलींगच्या भीतीने भाडिपाचे ‘अतिशय निर्लज्ज कांदेपोहे’ रद्द

मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इंडियाज गॉट लॅटेंट, या समय रैनाच्या शोमध्ये आक्षेपार्ह, बिभस्त विधान केल्या प्रकरणी युट्यूबर रणवीर अलाहबादियासह अनेक जणांवर FIR नोंदवण्यात आला आहे. देशभरात या चुकीच्या विधानावरून रणवीरला जोरदार ट्रोल करण्यात येत आहे. त्यानंतर आता मराठीतील लोकप्रिय युट्युब कंटेट क्रिएटर भारतीय डिजिटल पार्टी अर्थात भाडिपाने त्यांचा सध्या सुरु असलेला आणि सभ्यतेच्या मर्यादा पार करत चाललेला ‘अतिशय निर्लज्ज कांदेपोहे’ हा शो रद्द केला आहे. या शोचा पहिला एपिसोड अभिनेत्री भाग्यश्री लिमयेसह पार पडला होता. आता १४ फेब्रुवारी रोजी प्रसारित होणाऱ्या एपिसोडमध्ये सुपरस्टार सई ताम्हणकर सहभागी होणार होता. मात्र इंडियाज गॉट लॅटेंटच्या प्रकरणामुळे ‘तापलेल्या वातावरणात’ भाडिपाने हा शो पुढे ढकलला आहे. शिवाय या शोसाठी ज्यांनी तिकिटे बुक केली होती त्यांना पैसे परत दिले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
या शोसंदर्भातील आतापर्यंतच्या सर्व पोस्ट भाडिपाच्या सोशल मीडियावर हटवण्यात आल्या आहेत. सई ताम्हणकर स्पेशल ‘अतिशय निर्लज्ज कांदेपोहे’ हा कार्यक्रम पुढे ढकलला, याबद्दल जाहीर सूचना देणारी पोस्टही हटवण्यात आली आहे. भाडिपाने यासंदर्भात एक विशेष सूचना जारी केली. त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘भाडिपाच्या फॅन्सना कळवण्यात वाईट वाटतं आहे की सध्या ‘वातावरण तापल्यामुळे’ १४ फेब्रुवारीला होणारा अतिशय निर्ल्लज कांदे पोहेचा शो आम्ही पुढे ढकलत आहोत. तसंही व्हॅलेन्टाइन्स डेला प्रेमापेक्षा जास्त द्वेषच मिळतो. पण आमचं आमच्या चाहत्यांवर प्रेम आहे. आमच्या टॅलेंटला आणि प्रेक्षकांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे.’
SL/ML/SL
12 Feb. 2025