रेल्‍वे रूळांवरील उड्डाणपुलांचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून वाहतुकीस खुले करावेत

 रेल्‍वे रूळांवरील उड्डाणपुलांचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून वाहतुकीस खुले करावेत

मुंबई दि.10(एम एमसी न्यूज नेटवर्क): मुंबईकर नागरिकांसाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या पूल खात्‍यामार्फत महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्‍प हाती घेण्‍यात आले आहेत. विविध पुलांची उभारणी करताना महानगरपालिका, रेल्‍वे, पोलिस, ‘बेस्‍ट’ यांच्‍यात समन्‍वय व सुसंवाद असावा. प्रलंबित बाबी सुसमन्‍वयाने सोडवाव्‍यात. त्‍यासाठी कालमर्यादा निश्चित कराव्‍यात. पुलांचे बांधकाम नियोजित कालावधीपूर्वी पूर्ण करण्‍याकामी प्रयत्‍नशील राहावे, असे स्‍पष्‍ट निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांनी दिलेत. अंधेरीतील गोपाळकृष्‍ण गोखले पूल, विक्रोळी पूल, कर्नाक पूल या रेल्‍वे रूळांवरील उड्डाणपुलांचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून ते वाहतुकीस खुले करावेत, असेदेखील निर्देश श्री. बांगर यांनी दिले.

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या पूल खात्‍यामार्फत मुंबई महानगरात विविध ठिकाणी पूल उभारणीची कामे सुरू आहेत. यात प्रामुख्‍याने गोपाळकृष्‍ण गोखले पूल, शीव (सायन) पूल, बेलासिस पूल, कर्नाक पूल, विद्याविहार पूल आणि विक्रोळी पूल आदींचा समावेश आहे. बृहन्‍मुंबई महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्‍या मार्गदर्शनाखाली पूल विकासाची विविध कामे प्रगतिपथावर आहेत. या पार्श्‍वभूमीवर अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर आणि सहपोलिस आयुक्‍त (वाहतूक) अनिल कुंभारे यांनी आज महानगरपालिका, रेल्‍वे, पोलिस आणि बृहन्‍मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रम (बेस्‍ट) अधिका-यांची महानगरपालिका मुख्यालयात संयुक्‍त बैठक घेतली, त्‍यावेळी त्‍यांनी निर्देश दिले. सहायक आयुक्त (एफ दक्षिण) नितीन शुक्ला, प्रमुख अभियंता (पूल) उत्‍तम श्रोते, प्रमुख अभियंता (रस्‍ते व वाहतूक) गिरीश निकम, जल अभियंता पुरूषोत्‍तम माळवदे यांच्‍यासह रेल्‍वे विभागाचे, ‘बेस्‍ट’ चे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर म्‍हणाले की शीव उड्डाणपूल निष्कासनाची कार्यवाही प्रलंबित आहे. नागरिकांची गैरसोय होता कामा नये, याची खबरदारी रेल्‍वे प्रशासनाबरोबरच महानगरपालिकेने देखील घेतली पाहिजे. प्रलंबित बाबी समन्‍वयाने सोडविल्‍या पाहिजेत. शीव पुलाची उभारणी निश्चित कालावधीत पूर्ण होण्‍यासाठी योग्‍य नियोजन करत विविध कामांसाठी कालमर्यादा आखावी. शीव रेल्‍वेस्‍थानकाच्‍या पूर्व आणि पश्चिम बाजूकडील प्रलंबित कामे मार्गी लावण्‍यासाठी महानगरपालिकेच्‍या विविध खात्‍यांनी एकत्रितपणे कार्यवाही करावी. पादचारी पूल उभारणीत अडथळा ठरणारी बांधकामे हटवणे, सांडपाणी वाहक नलिका बंद करणे, सार्वजनिक प्रसाधनगृहाचे निष्कासन, ‘बेस्‍ट’ वाहिन्‍यांचे स्‍थलांतरण, जाहिरात फलकाचे निष्‍कासन आदी कामे अधिक वेगाने पूर्ण केली पाहिजे, असे निर्देश देत श्री. बांगर यांनी या कामांसाठी कालमर्यादादेखील निश्चित केली. तसेच, ३१ मे २०२६ पर्यंत शीव (सायन) उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्‍यासाठी प्रयत्‍न करावेत, अशा सूचना देखील श्री. बांगर यांनी केल्या.

अंधेरी पूर्व – पश्चिमेला जोडणा-या गोपाळकृष्ण गोखले पुलाचे दुसऱया टप्प्यातील रेल्वे भागातील पुलाचे (रेल्वे ओव्हरब्रीज) काम नुकतेच पूर्ण झाले आहे. महानगरपालिकेच्या हद्दीतील पोहोच (Approach) रस्त्याचे काम एप्रिल महिना अखेरपर्यंत पूर्ण करून ३० एप्रिल २०२५ पासून गोखले पूल पूर्ण क्षमतेने वाहतुकीस खुला करावा, असे निर्देश श्री. बांगर यांनी दिले. कर्नाक रेल्वे उड्डाणपूल प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा असलेली ५५० मेट्रिक टन वजनी उत्‍तर बाजूची तुळई (गर्डर) रेल्‍वे भागात सरकविण्‍याची कार्यवाही नुकतीच पूर्ण झाली आहे. पावसाळा सुरू होण्‍यापूर्वी म्‍हणजेच १० जून २०२५ पर्यंत कर्नाक पूल उभारणी कामातील उर्वरित सर्व कामे अधिक वेगाने पूर्ण करावीत, असेदेखील श्री बांगर यांनी नमूद केले.

बेलासिस पुलाचे काम करण्‍यासाठीचा कंत्राट कालावधी एप्रिल २०२६ पर्यंत आहे. मात्र, बेलासिस पुलाचे बांधकाम नियोजित कालावधीपूर्वी पूर्ण करून डिसेंबर २०२५ अखेरपर्यंत वाहतुकीस खुला करण्‍यासाठी प्रयत्‍नशील राहावे, असे निर्देश देत श्री. बांगर म्‍हणाले की, पूल बांधकामास अडथळा ठरणारी १२ बांधकामे हटविण्‍यात आली आहेत. उर्वरित १२ बांधकामे महिन्‍याभरात हटविली पाहिजेत, व्‍यावसायिकांचे पुनर्वसन सुयोग्‍य ठिकाणी केले पाहिजे. विद्याविहार पुलाच्‍या दोन्‍ही तुळया स्‍थापित झाल्‍या आहेत. पुलाची उर्वरित कामे मार्गी लावण्‍यासाठी रेल्‍वेस्‍थानकाच्‍या पूर्व बाजूची काही बांधकामे हटवावी लागणार आहेत. पश्चिम दिशेला उतार (सॉलिड रॅम्‍प) करावा लागणार आहे. पादचारी वाहतूक सुरळीत सुरू राहण्‍यासाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे. विद्याविहार पूल वाहतुकीस लवकरात लवकर खुला करण्‍याचा महानगरपालिकेचा मानस असल्‍याचे श्री. बांगर यांनी स्‍पष्‍ट केले.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *