अमेरिकेकडून 104 बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांची घरवापसी
![अमेरिकेकडून 104 बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांची घरवापसी](https://mmcnewsnetwork.com/wp-content/uploads/2025/02/US-Indian.jpg)
नवी दिल्ली,दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेतील बेकायदा भारतीय स्थलांतरितांना परत पाठवण्याची प्रक्रिया सोमवारी सुरू झाली. ‘सी-१७’ या अमेरिकन लष्कराच्या विमानातून टेक्सासमधील सॅन अँटोनियो येथून २०५ बेकायदा स्थलांतरितांना भारतात परत पाठविले जात असल्याचे वृत्त ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने दिले आहे. पैकी १०४ भारतीयांना परत पाठवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी याच महिन्यात अमेरिकेचा दौरा करणार असून ते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेटही घेणार आहेत. असे असताना या चर्चेची वाट न पाहता अमेरिकेने कारवाई सुरू केली आहे.
अमेरिकेत १.१० कोटी बेकायदा स्थलांतरित आहेत असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. स्थलांतरितांविरोधात कठोर पावले उचलण्याची घोषणा केल्यानंतर भारतात पाठवण्यात येणारा हा स्थलांतरितांचा पहिला गट आहे. याविषयी दिल्लीतील अमेरिकी दूतावासाशी संपर्क साधला असता, त्यांच्या प्रवक्त्याने सांगितले की, बेकायदा स्थलांतरितांसाठी जोखीम पत्करण्याची गरज नाही. गेल्या वर्षी अमेरिकेतून जवळपास १,१०० बेकायदा स्थलांतरित विशेष विमानांनी भारतात परत पाठवण्यात आले होते. अमेरिकेच्या स्थलांतर विभागाचे अधिकारी जवळपास २० हजार बेकायदा भारतीय स्थलांतरितांना परत पाठवण्यास सज्ज आहेत. एका अंदाजानुसार, अमेरिकेत जवळपास सात लाख २५ हजार बेकायदा भारतीय स्थलांतरित आहेत.