महाराष्ट्रात बांगलादेशी घुसखोरांचा वाढता धोका

 महाराष्ट्रात बांगलादेशी घुसखोरांचा वाढता धोका

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये बांगलादेशी घुसखोरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून, त्यामुळे राज्याची सुरक्षा धोक्यात आल्याचा गंभीर आरोप हिंदु जनजागृती समितीने केला आहे. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत समितीचे प्रवक्ता सतीश कोचरेकर यांनी या विषयावर सरकारकडे तातडीने कठोर पावले उचलण्याची मागणी केली.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, पुणे, कोल्हापूर, सोलापूर आदी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोर आढळून आल्याचे दिसत आहे. अनेक ठिकाणी बनावट ओळखपत्रे वापरून हे घुसखोर राहात असून, त्यांच्या उपस्थितीमुळे गुन्हेगारी वाढ, रोजगाराच्या संधींवर परिणाम आणि सामाजिक अस्थिरतेचा धोका निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर, राज्यभरात विशेष ‘घुसखोर शोध मोहिम’ राबवून सर्व बांगलादेशी घुसखोरांना ओळखून त्यांना तत्काळ देशाबाहेर हाकलावे, अशी समितीची प्रमुख मागणी आहे. तसेच, घुसखोरांना मदत करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि बनावट ओळखपत्रे तयार करणाऱ्या टोळ्यांवर कठोर कारवाई करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सामाजिक कार्यकर्ते आणि वकीलांनी काही धक्कादायक प्रकरणेही समोर आणली. संभाजीनगरमधील सिल्लोड येथे एक लाखाहून अधिक बांगलादेशी घुसखोरांना बोगस प्रमाणपत्रे देण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. तसेच, अभिनेता सैफ अली खान यांच्या घरात घुसखोरी करणारा मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद हा बांगलादेशी नागरिक बनावट नावाने मुंबईत राहत असल्याचे उघड झाले.

सनातन संस्थेचे प्रवक्ता अभय वर्तक, अधिवक्ता
राहुल पाटकर यांनीही घुसखोरांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे सांगितले. सरकारने वेळीच कठोर पावले उचलली नाहीत, तर भविष्यात महाराष्ट्राची स्थिती पश्चिम बंगाल आणि आसामसारखी होण्याचा धोका आहे, असे त्यांनी नमूद केले.

या मुद्द्यावर जनजागृतीसाठी हिंदु जनजागृती समिती संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलने, मोर्चे, स्वाक्षरी अभियान आणि पोलिस तक्रारी दाखल करण्याचे नियोजन करत आहे. राज्य सरकारने या गंभीर समस्येकडे वेळीच लक्ष द्यावे आणि सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी समितीची ठाम भूमिका आहे.

ML/ML/PGB
3 Feb 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *