५ फेब्रुवारीपर्यंत गंगा आरती तात्पुरती स्थगित
वाराणसी, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यासाठी देशभरातून करोडोंच्या संख्येने जमा झालेले भाविक कुंभस्नानानंतर आसपासच्या महत्त्वाच्या तीर्थस्थळांनी भेट देत आहेत. यामुळे गेल्या आठवड्यात अयोध्येतील प्रशासनाने पुढील काही काळ अयोध्येला येण्याच्या बेत करू नका अशी विनंती केली आहे. त्यानंतर आता वाराणसी येथे दररोज होणारी गंगा आरती देखील काही काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. वाराणसीमध्ये गेल्या काही दिवसांपासून आलेल्या भाविकांच्या लाटेमुळे येत्या ५ फेब्रुवारीपर्यंत दररोज संध्याकाळी होणारी गंगा आरती बंद ठेवण्यात येणार आहे. वाढत्या गर्दीमुळे काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गंगा सेवा निधीने हा निर्णय घेतला आहे.
भाविकांच्या मोठ्या गर्दीमुळे दशाश्वमेध घाटावर मोठी गर्दी उसळली आहे. या गर्दीचे नियंत्रण करण्यात प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे लोकांची सुरक्षितता लक्षात घेऊन सर्वसामान्यांना या घाटावर प्रवेश बंद करण्यात आला आहे. शिला घाट व अस्सी घाट या ठिकाणी होणाऱ्या गंगा आरतीलाही भाविक मोठी गर्दी करत आहेत. त्याचा परिणाम शहराच्या दैनंदिन जीवनावर पडत आहे.
यामुळे रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी होत असून दैनंदिन जीवनाच्या वस्तूही महागल्या आहेत. धार्मिक स्मृतीचिन्हे, खानपान व इतर दुकानांमध्ये मोठी गर्दी होत आहे. असे असले तरी शहरातील गर्दीवर नियंत्रण मिळवता मिळवता नाकी नऊ आले असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. त्यामुळेच येत्या ५ फेब्रुवारीपर्यंत गंगा आरती तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. गंगा आरती स्थगित करण्यात आल्यामुळे अनेक भाविकांचा हिरमोड झाला असून त्यांना केवळ दर्शन घेऊनच परतावे लागत आहे. काही दिवसांपूर्वी महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीमुळे सर्वच धार्मिक ठिकाणांवर अधिक दक्षता पाळण्यात येत आहे.
SL/ML/SL
1 Feb. 2025