चेहरेपट्टी सक्तीमुळे मंत्रालयातील प्रवेश झाले त्रासदायक
मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्राची राजधानी असणाऱ्या मुंबईतील राजकीय शक्तीस्थळ असणाऱ्या मंत्रालयात आता चेहरेपट्टी ओळख दाखवणे सक्तीच्या करण्यात आलेले आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला आणि ज्यांच्याकडे ही चेहरेपट्टीची ओळख नाही त्यांना या ठिकाणी प्रवेश करणे अत्यंत त्रासदायक झालेले आहे. यामुळे एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे .
मंत्रालयात येणाऱ्या अनावश्यक माणसांना रोखण्यासाठी त्यासोबतच अनावश्यक गर्दी कमी करण्यासाठी मंत्रालयातील सर्व प्रवेशद्वारांवर चेहरेपट्टी ओळख दाखवणारे यंत्रे बसवण्यात आली आहेत. या यंत्रामध्ये तुमचा चेहरा फीड केलेला असेल आणि तो तसा दिसला तरच तुमचा प्रवेशासाठीचा दरवाजा उघडला जाईल अशी तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद 31 जानेवारीपासून लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्यांचे चेहरे अद्याप त्या यंत्रणेमध्ये सामील झालेले नाहीत अशा मंत्रालयीन कर्मचारी, अधिकारी आणि पत्रकार यांना देखील कालपासून मंत्रालयात प्रवेश करणे अत्यंत तापदायक ठरलेले आहे .
मंत्रालयामध्ये अनेकदा अनावश्यक माणसे येतात ते आत्मदहनाचा प्रयत्न करतात अथवा कोणत्याही मंत्रालयाच्या अथवा अधिकाऱ्यांच्या दालनात जाऊन तिथे अनावश्यक गर्दी करतात आणि त्यामुळे कामाचा खोळंबा होतो अशा वारंवार तक्रारी येत होत्या. ही अनावश्यक गर्दी कमी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नवीन कारकिर्दीमध्ये सुरक्षा यंत्रणेमध्ये बदल करून चेहरेपट्टी करण्यासाठीचे यंत्र बसवण्यात आले आहे .
त्यात मंत्रालयामध्ये नियमित येणाऱ्या आणि जाणाऱ्या कर्मचारी हंगामी कर्मचारी अधिकारी आणि पत्रकार यांचे चेहरे समाविष्ट करण्यात आले आहेत. मात्र अजूनही बऱ्याच जणांचे चेहरे या यंत्रणेत समाविष्ट नाहीत. यामुळे अनेक अधिकारी, पत्रकार यांना मंत्रालयात प्रवेश करणे तापदायक झाले आहे.
शनिवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध अष्टपुत्रे यांना देखील बराच काळ प्रवेशद्वारावर ताटकळत बसावे लागले होते. याशिवाय काही सनदी अधिकाऱ्यांना महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वतःची चेहरेपट्टी करून आत मध्ये प्रवेश मिळवून दिला, तर मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत आलेल्या 25 ते 30 कार्यकर्त्यांना पोलीस कर्मचाऱ्यांची चेहरेपट्टी दाखवून जबरदस्तीने प्रवेश देण्यात आला . काल मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाची निवडणूक आणि सर्वसाधारण सभा होती त्यावेळी यासाठी येणाऱ्या अनेक पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आला. अखेर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सांगून हे प्रवेश करून घेण्यात आले.
अशा पद्धतीची सुरक्षा यंत्रणा बसवताना आवश्यक असणारी काळजी घेण्यात आलेली नाही हे आता स्पष्ट झालेले आहे. मंत्रालयामध्ये केवळ कर्मचारी अधिकारी आणि पत्रकार येत नाहीत तर मंत्री त्यांच्याबरोबर येणारे त्यांचे कार्यकर्ते, आमदार, माजी आमदार, खासदार , माजी खासदार अशा अनेकांचा समावेश असतो या सगळ्यांसाठी नेमकी काय यंत्रणा उपलब्ध करण्यात आलेली आहे याची त्यांना अद्याप कोणतीही कल्पना देण्यात आलेली नाही. याशिवाय अनेक जणांची चेहरेपट्टी या यंत्रणेमध्ये समाविष्टच करण्यात आलेली नाही यामुळे इथे प्रवेश करणे आता तापदायक ठरू लागलेले आहे .
या संदर्भात प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी यामागील उद्देश जर अनावश्यक गर्दी रोखणे आणि अनावश्यक माणसांना प्रवेश देणे रोखणे हा असेल तर तो चांगला आहे. मात्र सर्वसामान्य माणसाला आपल्या घटनात्मक अधिकारापासून वंचित ठेवणे असे असेल तर मात्र त्याचा निषेध करायला हवा असे म्हटले आहे.
ML/ML/SL
1 Feb. 2025