कुर्ला स्क्रॅप मार्केटला भीषण आग
मुंबई दि.1(एम एमसी न्यूज नेटवर्क): मुंबईच्या कुर्ला भागातील स्क्रॅप मार्केटमध्ये आज संध्याकाळी भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. मुंबई महानगरपालिका प्रशासनाने या घटनेची पुष्टी केली असून, आग विझवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
सुमारे संध्याकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास आग लागण्यास सुरुवात झाली. प्राथमिक माहितीनुसार, ही आग स्क्रॅप मटेरियलच्या दुकानांपुरती मर्यादित आहे. मात्र, स्क्रॅप मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात ज्वलनशील पदार्थ असल्याने आग झपाट्याने वाढण्याची शक्यता होती. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या दाखल झाल्या आहेत. यामध्ये ४ फायर इंजिन,
१ कम्बॅट फायर फोर्स, २ फायर टँकर्स, १ मोटर वॉटर टँकर, १ मोठा फायर ट्रक, ६ जेट टँकर्स आणि २ अॅडिशनल वॉटर टँकर्स यांचा समावेश आहे. बचाव कार्यासाठी अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी आणि २ सुरक्षा अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. तसेच १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका तैनात करण्यात आली आहे.
आगीचा धूर दूरपर्यंत दिसत असून परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. मात्र, सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद नाही. तरीही प्रशासन सतर्क आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
SL/ML/SL
1 Feb. 2025