अर्थसंकल्पात बिहारचा उल्लेख पण मुंबई – महाराष्ट्राच्या तोंडाला मात्र पाने पुसली
मुंबई, दि.1(एम एमसी न्यूज नेटवर्क): भाजपा आघाडी सरकारचा अर्थसंकल्प हा आघाडी सरकार वाचवण्याच्या उद्देशाने सादर करण्यात आला आहे. संपूर्ण अर्थसंकल्पात फक्त बिहारचीच चर्चा करण्यात आली असून मुंबई व महाराष्ट्राचे नाव एकदाही घेतले गेले नाही. मोदी सरकारचा हा अर्थसंकल्प महाराष्ट्रासाठी निराशाजनक असून मुंबई व महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे, अशी प्रतिक्रिया मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
अर्थसंकल्पावर बोलताना खासदार प्रा. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, आयकराची मर्यादा वाढवून नोकरदार व मध्यमवर्गियांना मोठा दिलासा दिल्याचा ढोल भाजपा बडवत आहे परंतु याच्याशी निगडीत अनेक अटी जोडल्या गेलेल्या आहेत, ज्याची माहिती सरकारनेही अद्याप दिलेली नाही. खोटे बोलणे ही भाजपची सवय झाली आहे त्यामुळे खोटे बोल पण रेटून बोल असा हा प्रकार आहे. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने भाजपा युतीला पाशवी बहुमत दिले त्याचा विसर भाजपा सरकारला पडलेला दिसला. एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी महाराष्ट्रासाठी निधी आणण्यासाठी काय केले, महाराष्ट्रातील प्रकल्पांना भऱीव निधी या अर्थसंकल्पात दिलेला नाही. मुंबईली लोकल व रेल्वेसाठी काहीही तरतूद या अर्थसंकल्पात केलेली नाही, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.
अर्थसंकल्पात मुंबई किंवा महाराष्ट्राचा एकदाही उल्लेख केला नाही पण बिहार विधानसभेच्या निवडणुका लवकरच होत असल्याने पटणा, बिहारचा उल्लेख करत त्यांच्यासाठी भरघोस निधीची तरतूद करण्यात आली आहे. महिला, विद्यार्थी, बेरोजगारी यासंदर्भात भाजपा सरकारने कोणतेही ठोस नियोजन केलेले नाही. सर्वसामान्य जनता जीएसटीच्या माध्यमातून सर्वात जास्त कर भरते त्यांच्यासाठी अर्थसंकल्पात काहीच नाही. भाजपा सरकार आल्यापासून कर दहशतवादीची प्रचंड आहे त्यातून जनतेला दिलासा दिलेला नाही.
शिक्षण, ग्रामीण विकास, वाहतूक, माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राच्या निधीत सरकारने मागील वर्षापेक्षा या वर्षी कपात केली आहे. मागील वर्षी शिक्षण क्षेत्रासाठी २.६० टक्के तरदूत केली होती त्यात कपात करून ती २.५३ टक्के करण्यात आली. शिक्षणासारख्या अत्यंत महत्वाच्या क्षेत्राचा निधी कपात करुन भाजपा सरकार विकासाची कोणती दिशा दाखवणार आहे. ग्रामिण विकासासाठी ५.५१ टक्के असलेली तरतूद यावर्षी कमी करून ५.२६ टक्के करण्यात आली आहे, असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.
SW/ML/SL
1 Feb. 2025