मनोज जरांगे यांचं सामुहिक आमरण उपोषण स्थगित…
जालना दि ३०– मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आपले सातवे आमरण उपोषण पुन्हा एकदा स्थगित केले आहे. आ सुरेश धस आणि खा बजरंग सोनावणे यांच्याहस्ते रस पिऊन त्यांनी आपले उपोषण सोडले. जरांगे यांनी सामुहिक आमरण उपोषणात सहभागी झालेल्या उपोषणकर्त्यांना स्वतःच्या हाताने पाणी पिऊ घालत त्यांचं देखील आमरण उपोषण स्थगित केले.
देवेंद्र फडणवीस मराठ्यांशी गद्दारी करणार नाहीत, फडणवीस मराठ्यांच्या मागण्यांची अंमलबजावणी करतील अशी अपेक्षा जरांगे यांनी यावेळी व्यक्त केली.जर फडणवीस यांनी मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केल्या नाही, तर राज्याच्या मराठा समाजाची बैठक घेऊन मुंबई येथे जाण्याची तारीख जाहीर करू असा इशारा जरांगे यांनी दिला आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू होते. ते उपोषण त्यांनी आज ३० जानेवारीला गुरूवारी मागे घेतले. त्या आधी जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे गुरूवारी दुपारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मोठी घोषणा करीत उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासोबतच येत्या काळात मागण्या मान्य न झाल्यास मुंबईला जाण्याचा निर्णय जरांगे पाटील यांनी घेतला आहे.