सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास आवश्यक सुविधा तातडीने

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा, यंत्रसामुग्री, मनुष्यबळ तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रिफ यांनी दिले. तसेच या वैद्यकीय महाविद्यालयातून गोवा येथे रुग्ण पाठवण्याची पद्धत ताबडतोब बंद करण्याचे आदेशही मंत्री मुश्रीफ यांनी दिले.
सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रश्नांबाबत पालकमंत्री नितेश राणे यांनी आढावा बैठक घेण्याबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांचेकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. मंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, निलेश राणे, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग शासकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांची रिक्त पदे सहा महिन्यात भरण्याच्या सूचना देऊन मंत्री मुश्रिफ म्हणाले की, वर्ग तीन आणि वर्ग चारची पदे तसेच तांत्रिक आणि अतांत्रिक पदे बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यास परवानगी दिली आहे. ही पदभरती पारदर्शक व्हावी याकडे कटाकक्षाने लक्ष द्यावे. ही सर्व पदे येत्या 8 महिन्यात भरावीत. तसेच ज्या ठिकाणी जादा पदे आहेत तेथील प्राध्यापक वर्गाची सेवा सिंधुदुर्ग येथे देण्याची व्यवस्था करावी. नर्सिंग महाविद्यालयाची वसतीगृहाची इमारत पाडण्यास आरोग्य विभागाने परवानगी द्यावी, नर्सिंगच्या विद्यार्थ्यांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था करण्यात यावी यासाठी भाडेतत्वावर जागा घ्यावी, विभागाच्या अधिकाऱ्यांनी या महाविद्यालयास प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थिती जाणून घ्यावी आणि करावयाच्या सुधारणा आणि पुरवावयाच्या सोयी यांची माहिती द्यावी, नव्याने उभारण्यात येणाऱ्या इमारतींची कामे तातडीने मार्गी लावावीत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जादाची 13 एकर जमीन देण्याचा प्रस्ताव आहे. त्यापैकी कौशल्य विकास विभागाकडील आयटीआयची 3 एकर जागा देण्यास मान्यता देण्यात आली. तसेच समाजिक वनीकरण विभागाकडील 10 एकर जागेसाठी पाठपुरावा करावा, मंत्रिमंडळासमोर लवकरात लवकर प्रस्ताव सादर करावा, अशा सूचनाही बैठकीमध्ये देण्यात आल्या.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या भरतीबाबत जाहिरात प्रसिद्ध झाली असून येत्या मे महिन्यापर्यंत ही पदे भरली जातील. तर वर्ग तीन, वर्ग चार आणि तांत्रिक, अतांत्रिक पदे येत्या 8 महिन्यात भरली जातील अशी माहिती आयुक्त निवतकर यांनी दिली.
ML/ML/PGB 29 Jan 2025