अटल सेतूवर आणखी वर्षभर सवलतीच्या दरानेच पथकर आकारणी

 अटल सेतूवर आणखी वर्षभर सवलतीच्या दरानेच पथकर आकारणी

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईतील अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू मार्गावर सध्या सुरू असलेल्या सवलतीच्या दरानेच आणखी वर्षभर पथकर आकारणी सुरु राहणार आहे. यासंदर्भात मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूच्या वापरासाठी यापुर्वी ४ जानेवारी २०२४ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत एमएमआरडीएने प्रस्तावित केलेल्या दराच्या ५० टक्के सवलतीच्या दराने पथकर (कमीत कमी २५० रुपये इतका) आकारणीचा निर्णय घेण्यात आला होता. या दराचा एक वर्षानंतर आढावा घेण्याचा निर्णयही घेण्यात आला होता.

त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आणखी एक वर्षभर म्हणजेच ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत सध्या सुरु असलेल्या सवलतीच्या दरानेच पथकर आकारणीस मान्यता देण्यात आली. मुंबई महानगर विकास प्राधिकरणातर्फे सुमारे २२ किलोमीटर लांबीचा अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू बांधण्यात आला. हा उड्डाणपूल १३ जानेवारी २०२४ पासून सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

ML/ML/PGB 28 Jan 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *