चीनमध्ये बाटलीतून विकलं जातंय वाघाचे मूत्र

गाउंझाउ, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चीन नेहमीच अजबगजब गोष्टींसाठी चर्चेत येत असतो. सध्या चीनमध्ये चक्क वाघाची मुत्रांची बाटलीबंद विक्री होत असून याला मोठी मागणी निर्माण झाली आहे. साउथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार इथं एका बाटलीमध्ये वाघाची लघवी 50 युआन (साधारण 600 रुपये) इतक्या किमतीला विकली जात आहे. चीनमधील लोक सध्या संधीवातासारख्या शारीरिक व्याधीसाठी वैद्यकिय उपचार घेण्याऐवजी स्थानिक थेट प्राणीसंग्रहालय गाठत आहेत. ‘रूमेटिक आर्थराइटिस’वर उपचार करण्यासाठी इथं चक्क वाघाच्या मूत्राचा वापर केला जात आहे. याच कारणास्तव चीनमधील बाजार आणि प्राणी संग्रहालयांमधील काऊंटरवर चांगल्या किमतीला वाघाच्या मूत्राची विक्री होत असून, याला प्रचंड मागणी असल्याचं पाहायला मिळत आहे.
दक्षिण पश्चिम चीनमध्ये असणाऱ्या सिचुआन प्रांतातील एका प्राणीसंग्रहालयात वाघाच्या लघवीचा वापर संधीवातावरील उपाय म्हणून केला जात आहे. याआन बिफेंगक्सिया वाइल्डलाइफ जू नावाच्या या प्राणीसंग्रहालयाला भेट देणाऱ्यांना हे अजब Product विकलं जात आहे. वाघाच्या लघवीमुळं संधीवात, मांसपेशींमधील वेदना अशा शारीरिक व्याधी दूर होऊन बऱ्याच अंशी आराम मिळतो असा दावा इथं केला जात आहे.
इतकंच नव्हे, तर या लघवीचा औषध म्हणून नेमका कसा वापर करावा यासाठी या प्राणीसंग्रहालयानं काही मार्गदर्शक सूचनासुद्धा जारी केल्या आहेत. हे मूत्र औषध म्हणून प्राशनही करता येते असं सांगत कोणा एका व्यक्तीला कशाचीही अॅलर्जी असल्यास मात्र तिचं सेवन टाळावं अशा स्पष्ट सूचना प्राणीसंग्रहालयातून करण्यात आल्या आहेत. मात्र अनेक डॉक्टरांनी या प्रकरणी तीव्र विरोध दर्शवला असून, अशा प्रकारच्या अप्रमाणित उपचारांना वाव दिल्यास मोठा धोका उदभवू शकतो ही बाब प्रकर्षानं लक्षात आणून दिली आहे.
SL/ML/SL
28 Jan. 2025