अमेरिकेने हाकललेल्या स्थलांतरीतांना स्वीकारण्यास मेक्सिकोचा नकार

मेक्सिको, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून ट्रम्प यांनी सूत्रे हाती घेतल्यापासून इथे बेकायदा घुसखोरी केलेल्या लोकांचे धाबे दणाणले आहे. बेकायदेशीररित्या अमेरिकेत राहणाऱ्या व्यक्तींमध्ये सर्वाधिक संख्या मेक्सिकन आणि कोलंबियन नागरिकांची आहे. अमेरिकेने त्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. मात्र या देशांनी आपल्याच नागरिकांनासाठी दरवाजे बंद केले आहेत. त्यामुळे या स्थलांतरीतांची स्थिती दोलायमान झाली आहे. कोलंबिया आणि मेक्सिको या दोन देशांनी अमेरिकेहून आपल्या देशातील स्थलांतरितांना परत घेऊन येणारी विमाने मायदेशात उतरवण्यास थेट नकार दिला.
मेक्सिकोने परवानगी नाकारल्यामुळे हे विमान स्थलातरीतांना घेऊन तिथे जाऊ शकले नाही. मेक्सिकोने विमानाला परवानगी नाकारण्याचे कारण सांगितलेले नाही. परंतु निर्वासितांना परत पाठवण्याआधी अमेरिकेने आपली संमती घ्यावी, असे म्हटले आहे. विशेष म्हणजे ट्रम्प पुन्हा राष्ट्राध्यक्ष बनल्यापासूनच मेक्सिको आणि अमेरिकेचे संबंध यावरूनच बिघडले आहेत. ट्रम्प यांनी गल्फ ऑफ मेक्सिकोचे गल्फ ऑफ अमेरिका असे नामांतर करण्याची घोषणा केली आहे. त्यात निर्वासितांच्या परत पाठवणीसाठी ‘रिमेन इन मेक्सिको’ ही योजना जाहीर केल्याने या संबंधात आणखी वितुष्ट आले आहे.
कोलंबियाने आपल्या देशातील स्थलांतरितांना परत घेऊन येणाऱ्या अमेरिकेच्या विमानांना उतरू दिले नाही. त्यानंतर अमेरिकेने कोलंबियाहून आयात होणाऱ्या तेल, कॉफी, फुले या वस्तूंवर निर्बंध लावण्याची आणि आयात शुल्क वाढवण्याची धमकी दिल्यानंतर कोलंबियाने माघार घेतली आणि विमाने उतरवू दिली. मात्र भविष्यात यावरून दक्षिण अमेरिकेतील देशांबरोबर अमेरिकेचे एकप्रकारचे शीतयुद्ध होण्याची शक्यता आहे.
SL/ML/SL
28 Jan. 2025