मुख्य शासकीय सोहळ्यात राज्यपाल राधाकृष्णन यांची राष्ट्रध्वजाला मानवंदना

 मुख्य शासकीय सोहळ्यात राज्यपाल राधाकृष्णन यांची राष्ट्रध्वजाला मानवंदना

मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क):देशाच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज शिवाजी पार्क मुंबई येथे झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात राष्ट्रीय ध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात राज्यपालांनी प्रजासत्ताक दिन संचलनाचे निरीक्षण केले आणि विविध पथकांकडून मानवंदना स्वीकारली.

राज्यपालांनी यावेळी राज्यातील जनतेला उद्देशून संबोधित केले. राज्यपालांच्या भाषणाचा मराठी अनुवाद अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर यांनी वाचून दाखवला. या शासकीय सोहळ्याला राज्यपालांच्या पत्नी सुमती, विधान परिषदेचे अध्यक्ष प्रा. राम शिंदे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, सैन्य दलांचे वरिष्ठ अधिकारी, विविध देशांचे मुंबईतील वाणिज्यदूत, प्रशासन तसेच पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी तसेच निमंत्रित मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमानंतर राज्यपालांनी निमंत्रितांची भेट घेतली , सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यंदाच्या संचलनामध्ये भारतीय नौदल, गोवा पोलीस, महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दल, बृहन्मुंबई पोलीस सशस्त्र दल, बृहन्मुंबई पोलीस दंगल नियंत्रण पथक, बृहन्मुंबई सशस्त्र महिला पोलीस दल, मुंबई लोहमार्ग पोलीस दल, गडचिरोली , गोंदिया जिल्ह्याचे सी-६० पथक, गृह रक्षक दल (पुरुष), बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल, गृहरक्षक दल (महिला), राज्य उत्पादन शुल्क विभाग, वन विभाग, मुंबई अग्निशमन दल, बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दल, सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई , ठाणे जिल्हा, नागरी संरक्षण दल (पुरुष/ महिला) यांच्या कंपन्यांनी सहभाग घेतला.

राष्ट्रीय सेवा योजना (मुले/मुली) एम.सी.एम गर्ल्स हायस्कूल काळाचौकी, सी. कॅडेट कोअर (मुली), सी. कॅडेट कोअर (मुले), रोड सेफ्टी पॅट्रोल (मुली) रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल, दहिसर मुंबई, रोड सेफ्टी पॅट्रोल (मुले) डॉ.अँटोनिओ डिसिल्वा हायस्कूल दादर, मुंबई, रोड सेफ्टी पॅट्रोल (मुली) अंजुमान ए इस्माईल हायस्कूल, बांद्रा मुंबई, रोड सेफ्टी पॅट्रोल (मुले) रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल, दहिसर मुंबई, रोड सेफ्टी पॅट्रोल (मुली) मनपा शाळा पंतनगर, घाटकोपर (पूर्व) मुंबई, रोड सेफ्टी पॅट्रोल मनपा माणिकलाल एम. पी. एस इंग्लिश हायस्कूल, घाटकोपर मुंबई, स्टुडन्ट पोलीस कॅडेट (मुल-मुली) बृहन्मुंबई महानगरपालिका, ब्रास बँड पथक, पाईप बँड पथक आदी पथकांनी आपल्या शिस्तबद्ध संचलनाने उपस्थितांची मने जिंकली. पोलीस वाद्यवृंद तसेच पाईप बँड पथक यांना लोकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

यंदाच्या संचालनामध्ये ‘२४ तासात अष्टविनायक दर्शन’, वनविभागातर्फे ‘आईच्या नावे एक झाड’, आदिवासी विकास विभागातर्फे ‘वाघबारस’, मराठी भाषा विभागातर्फे ‘अभिजात मराठी’ यांसह विविध विभागांच्या चित्ररथांचा समावेश करण्यात आला.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *