ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी न्या. नरेंद्र चपळगावकर यांचे निधन
छ. संभाजीनगर, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे आज पहाटे 4.30 वाजता निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून कर्करोगाशी लढा देत असलेल्या चपळगावकरांनी भारतीय राजकीय आणि वैचारिक परंपरांचा आलेख आपल्या लिखाणातून सोप्या भाषेत सामान्यांपर्यंत पोहोचवला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन विवाहित कन्या आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव दुपारी 3 च्या सुमारास त्यांच्या जयनगर येथील निवासस्थानी आणण्यात आले आणि सायंकाळी 4 वाजता अंत्ययात्रा निघून साडेचार वाजता अंतिम संस्कार प्रतापनगर येथे करण्यात आले. नरेंद्र पुरुषोत्तम चपळगावकर यांचा जन्म 1938 साली झाला. त्यांचे वडील हैदराबाद स्वातंत्र्य चळवळीतील नेते होते. विधी आणि मराठी या विषयांत पदवी घेतल्यानंतर त्यांनी लातूरच्या दयानंद महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमधील माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयात अध्यापन केले. वकिली व्यवसायानंतर 1990 रोजी ते मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश झाले. मराठवाड्यातील साहित्य क्षेत्राला वळण देण्यात चपळगावकरांचे मोठे योगदान होते. कविता आणि कथालेखनाने सुरुवात करणाऱ्या चपळगावकरांनी वैचारिक लेखन सोप्या भाषेत मांडण्यावर भर दिला. त्यांनी 36 पुस्तके लिहिली. त्यापैकी तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ, कर्मयोगी सन्यासी (स्वामी रामानंद तीर्थ यांचे चरित्र), दीपमाळ, आणि नेहरू-पटेल यांच्या कार्यावर आधारित लेखन केले. नरेंद्र चपळगावकर यांचे लेखन त्यांच्या समृद्ध वैचारिकतेचा आणि सामाजिक जाणिवेचा ठसा होते. राजहंस प्रकाशनाचा ‘श्री. ग. माजगावकर स्मृती पुरस्कार’, मराठवाडा साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार, महाराष्ट्र फाऊंडेशनचा दिलीप चित्रे स्मृती पुरस्कार आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळाचा राम शेवाळकर स्मृती पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले. वर्धा येथे 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते.
ML/ML/SL
25 Jan. 2025