राज्यातील गुंतवणुकीतून सरकारने औद्योगिक क्षेत्रातही समतोल राखला
मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रासाठी गुंतवणुकीचे ऎतिहासिक सामंजस्य करारांची प्रथा सलग तिसऱ्या वर्षी कायम राहिली आहे. यंदा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात उद्योग, एमएमआरडीए आणि सिडको शिष्टमंडळाने तब्बल १५ लाख ७० हजार कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले आहेत.
दावोस येथील हे गुंतवणुक करार राज्यभरातील विविध जिल्ह्यांसाठीचे आहेत. प्रत्येक जिल्ह्यात काही हजार कोटींची गुंतवणूक यानिमित्ताने येणार असून औद्योगिक क्षेत्रात समतोल राखण्याचे कामही महायुती सरकारने केले आहे, अशी माहिती राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. दावोस दौऱ्यावरून परतल्यानंतर मुंबईत ते माध्यमांशी बोलत होते.
दावोस दौऱ्यातील गुंतवणूक करारांवरून विरोधकांची टीका अनाठायी आहे. एखादे चांगले काम सुरू असताना खोटेनाटे आरोप करत दिशाभूल करण्याचा प्रयत्न विरोधकांनी चालविल्याचा दावाही सामंत यांनी केला. मुंबई किंवा महाराष्ट्रातीलच अनेक कंपन्यासोबत दावोसमध्ये करार करण्यात आल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी केला होता. त्याला उत्तर देताना सामंत म्हणाले की, महाराष्ट्रातील एखादी कंपनी दावोस सारख्या जागतिक ठिकाणावरून गुंतवणुकीचे करार मदार करत असेल तर त्याचे स्वागतच व्हायला हवे, जागतिक पातळीवर आपल्या कंपन्या पोहचणे ही अभिमानाचीच बाब आहे असा टोलाही त्यांनी लगावला.
ML/ML/SL
23 Jan. 2025