कर्नाक पुलाच्या तुळई सरकविण्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण
मुंबई दि.15(एम एमसी न्यूज नेटवर्क): मशीद बंदर रेल्वे स्थानकाजवळील आणि पी. डि’मेलो मार्गाला जोडणाऱ्या १५४ वर्षे जुन्या कर्नाक पुलाच्या पुनर्बांधणीचा महत्त्वाचा टप्पा बृहन्मुंबई महानगरपालिकेने यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. या अंतर्गत ५५० मेट्रिक टन वजनाची उत्तर बाजूची लोखंडी तुळई (गर्डर) मंगळवार, १४ जानेवारी २०२५ रोजी ९.३० मीटर सरकविण्याची कार्यवाही यशस्वीपणे पार पडली.
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली पूल विभागाने मध्य रेल्वे प्रशासनासोबत समन्वय साधून हे आव्हानात्मक काम पूर्ण केले. कर्नाक पूल दक्षिण मुंबईतील मशीद बंदर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी महत्त्वाचा आहे. लोकमान्य टिळक मार्गावरील हा पूल धोकादायक झाल्यामुळे महानगरपालिकेने त्याच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले आहे.
उत्तर बाजूच्या तुळईचे सुटे भाग प्रकल्पस्थळी दाखल झाल्यानंतर त्यांचे जोडकाम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर काल (१४ जानेवारी) या तुळईचा ‘ट्रायल रन’ घेण्यात आला. रेल्वे हद्दीत तुळई स्थापित करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडे ‘ब्लॉक’ मिळण्याची विनंती करण्यात आली आहे. ब्लॉक मिळाल्यानंतर उर्वरित काम तातडीने पूर्ण होईल. तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक असलेल्या या प्रक्रियेसाठी विशेष तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात आले असून पुढील टप्प्यातील कामासाठी रेल्वे आणि महानगरपालिका प्रशासन एकत्रितपणे कार्यरत आहेत.
SW/ML/SL
15 Jan. 2025