सरकार करणार बिबट्यांची नसबंदी आणि वन्यप्राण्यांसाठी अन्नाची व्यवस्था

मुंबई दि १४– वन्य प्राण्यांमधील बिबट्यांची वाढती संख्या लक्षात घेता त्यांची नसबंदी करता येते का? यासंदर्भातली शक्यता तपासून पाहिली जात असून तशा पद्धतीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे लवकरच पाठवला जाईल अशी माहिती राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. त्यासोबतच वन्य प्राण्यांसाठी जंगलातच त्यांना अन्न मिळावे अशी व्यवस्था करण्याचे प्रयोजन असून त्यातूनच तृणभक्षी आणि त्यावर अवलंबून असलेले हे वन्य प्राणी यांची वनाबाहेर येण्याची संख्या कमी करण्याचे देखील नियोजन असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आज मंत्रालयातील पत्रकार कक्षात घेतलेल्या पत्रकार परिषदेत वनमंत्री गणेश नाईक यांनी गोरेवाडा प्राणी संग्रहालयात मरण पावलेले वाघ तसेच इतर ठिकाणी मरण पावलेले वाघ आणि बिबटे यांच्या संदर्भातील कारणांची माहिती दिली. यात गोरेवाडा प्राणी संग्रहालयातील वाघांना आणि एका बिबट्याला कोंबडीचे मांस खायला घातले होते त्यातूनच काही संसर्ग होऊन त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक दृष्ट्या समोर आले आहे असे ते म्हणाले. मात्र यामुळे त्यांना कोंबडीचे मांस देणे बंद करण्याच्या सूचना अधिकाऱ्याना करण्यात आल्या आहेत अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
वन्यप्राणी आणि मानव यांच्यातील वाढता संघर्ष लक्षात घेऊन वन्य प्राणी ज्या तृणभक्षी प्राण्यांवर आधारित आहेत किंवा अवलंबून आहेत त्यांना वनक्षेत्राच्या कोर भागात अन्न पाणी मिळेल अशी व्यवस्था करण्यात येईल. त्यामुळे वन्य प्राण्यांना देखील त्यांचे भक्ष तिथेच मिळेल अशी व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. ब्रिटिशांच्या काळात अशा पद्धतीचे नियोजन होते मात्र आता हे नियोजन बिघडले असल्यामुळे वन्य प्राणी पक्षाच्या शोधात मानवी वस्तीत येत असल्यामुळे असे प्रकार वाढू लागले आहेत असे मंत्री यावेळी म्हणाले .
कोकण परिसरामध्ये माकड, वानर आणि रानडुकरे यांच्या त्रासामुळे तेथील शेतकऱ्यांना शेती करणे तसेच घरात राहणे अवघड झाले आहे अशा प्रकारच्या तक्रारी आपल्याकडे प्राप्त झाले आहेत या संदर्भात लवकरच एक बैठक आयोजित करून यातून काही मार्ग काढता येईल का? यावर विचार केला जाईल असेही मंत्री गणेश नाईक यावेळी म्हणाले. आपण वनमंत्री असताना मागील काळात जपान मधील सुमोटोमो कंपनीसोबत करार करून त्या कंपनीच्या गुंतवणुकीने राज्यात वनक्षेत्र वाढवणे आणि त्यातून अन्नपदार्थांची निर्मिती केली जाणे अशा पद्धतीचा विचार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.