आपले सरकार सेवा पोर्टल’द्वारे दिल्या जाणार्या सेवांमध्ये वाढ …
मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षेत राज्य सेवा हक्क आयोगाची आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे पार पडली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित अधिकार्यांना महत्त्वाचे निर्देश दिले.
राज्यातील नागरिकांना आवश्यक त्या सेवा सुलभतेने उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ‘आपले सरकार सेवा पोर्टल’द्वारे सद्यस्थितीत ५३६ ऑनलाईन सेवा दिल्या जात आहेत, त्याचा नागरिकांना व्यापक प्रमाणात उपयोग होत आहे. या पार्श्वभूमीवर या ऑनलाईन सेवांमध्ये वाढ करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
गतिमान पारदर्शक कार्यपद्धतीच्या दृष्टीने लोकांना उपयुक्त ठरत असलेल्या ‘आपले सरकार सेवा पोर्टल’ द्वारे ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य होते. अधिक सक्रियतेने आणि सुलभरित्या व्यापक स्वरुपात या पोर्टलद्वारे नागरिकांना जास्तीत जास्त प्रमाणात ऑनलाईन सेवा उपलब्ध होतील, यादृष्टीने नियोजन करण्याचेही निर्देश यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकार्यांना दिले.
बैठकीत राज्य सेवा हक्क आयोगाच्या मुख्य आयुक्तांनी राज्य आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत तसेच भविष्यकालीन योजनांबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर सविस्तर सादरीकरण केले.
या बैठकीस राज्याच्या मुख्य सचिव, मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव, संबंधित विभागांचे प्रधान सचिव, राज्यातील सर्व सेवा हक्क आयुक्त आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ML/ML/SL
9 Jan. 2025